आंतरराष्ट्रीय तस्करांकडून ६,४00 कासवे पकडली
By admin | Published: January 12, 2017 01:01 AM2017-01-12T01:01:47+5:302017-01-12T01:01:47+5:30
ईशान्येकडील राज्यांमधून आग्नेय आशियाई देशांमध्ये तस्करीच्या मार्गाने पाठविण्यासाठी अवैधपणे पकडलेली ६,४00 कासवे उत्तर प्रदेशच्या
लखनऊ : ईशान्येकडील राज्यांमधून आग्नेय आशियाई देशांमध्ये तस्करीच्या मार्गाने पाठविण्यासाठी अवैधपणे पकडलेली ६,४00 कासवे उत्तर प्रदेशच्या वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पकडली. वजन व संख्या या दोन्ही दृष्टीने देशात पकडली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी वन्यजीवांची तस्करी असल्याचे मानले जात आहे.
‘फ्लॅपशेल टर्टल्स’ या वैज्ञानिक नावाने ओळखली जाणारी ही मध्यम आकाराची, गोड्या पाण्यातील कल्लेदार कासवे उत्तर प्रदेशातील नद्यांच्या पात्रात सापडतात. एका ट्रकमध्ये १४0 पोत्यांमध्ये भरलेली ही कासवे वन्यजीव विभागाच्या विशेष कृती दलाने सापळा रचून पकडली, असे या कृतीदलाचे प्रमुख अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले.
तस्करांच्या तावडीतून सुटका केलेल्या या कासवांची संख्या ६,४३0 असून त्यांचे वजन ४.४ टन एवढे आहे. कासवे भरलेल्या पोत्यांनी अर्धा ट्रक भरलेला होता. तो कोलकत्याला नेण्यात येणार होता. तेथून या कासवांची बांगलादेश, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, हॉंगकॉंग व चीन या पूर्व व आग्नेय अशियाई देशांमध्ये तस्करी करण्याचा तस्करांचा इरादा होता, असे चतुर्वेदी यांनी सांगितले. सध्या ही कासवे, कासवांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ या अमेरिकी स्वयंसेवी संस्थेच्या स्थानिक केंद्रात देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. या तस्करी टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेतले असून, इतरांचाही शोध सुरू आहे. (वृत्तसंस्था)
चीनमध्ये कासवांना मोठी मागणी
‘फ्लॅॅपशेल टर्टल’ या प्रजातीची भारतात आढळणारी कासवे दुर्मीळ नाहीत. पण वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये ही संरक्षित प्रजाती असल्याने या कासवांच्या शिकारीस बंदी आहे.
या कासवांचे मांस पौरुषत्व वाढविणारे असल्याचा समज असल्याने चीनसह आग्नेय आशियाई देशांमध्ये या कासवांना मोठी मागणी आहे. या कासवांच्या हाडाची पूड त्या देशांत पारंपरिक औषधे आणि काढे तयार करण्यासाठी वापरली जाते.ं
तस्करीच्या बाजारात लहान आकाराच्या ‘फ्लॅपशेल’ कासवाला एक हजार रुपये तर मोठ्या आकाराच्या कासवाला आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो.
नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या २८ प्रजातींच्या कासवांपैकी १४ प्रजातींचा अधिवास उत्तर प्रदेशात आहे. या राज्यातून दरवर्षी सुमारे २० हजार कासवांची तस्करी होते, असा अंदाज आहे.
अवैध शिकार आणि तस्करी याविरुद्धची कारवाई हल्ली बऱ्यापैकी कडक झाली असली तरी या कासवांची ज्या प्रमाणावर तस्करी होत आली आहे ती पाहता कासवाची ही प्रजातीही लवकरच विनष्ट होण्याची भीती आहे.
- रचना तिवारी, प्रवक्त्या, ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’