International Yoga Day 2018 : 'योग' जुळून आला; आंतरराष्ट्रीय योग दिनी रामदेव बाबा गिनीज बुकात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 12:42 PM2018-06-21T12:42:56+5:302018-06-21T12:46:54+5:30
राजस्थानमधील कोटा येथे रामदेव बाबा यांच्याकडून योगासनांचं प्रात्यक्षिक
कोटा: चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशातील विविध ठिकाणी योगासनांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. योग दिनाच्या निमित्तानं राजस्थान सरकारनं कोटामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी सहभागी घेतला. याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. एकाचवेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक जणांनी योगासनं करण्याचा विक्रम या कार्यक्रमात झाला.
राजस्थानमधील कोटा येथे योग दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारनं विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोन लाखांहून अधिक जणांनी योगासनं केली. यामध्ये 5 ते 100 वर्ष वयोगटातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यावेळी एका व्यक्तीनं सलग 1 तास 3 मिनिटं शीर्षासन केलं. या व्यक्तीनं आधीचा एक तास शीर्षासन करण्याचा विक्रम मोडीत काढला. तर एका व्यक्तीनं दीड हजार पुश अप्स केले.
राजस्थान सरकारनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला गिनीज बुकची टीमदेखील उपस्थित होती. एकाचवेळी दोन लाखांहून अधिक जणांनी योगासनं केल्यानं यावेळी विक्रमाची नोंद झाली. राजस्थान सरकारनं या कार्यक्रमासाठी रामदेव बाबांना निमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमात राजस्थानातील विविध जिल्ह्यांमधील लोक सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, संरक्षण दलाच्या जवानांचा समावेश होता.