इंटरनेट शटडाऊन, भारत पुन्हा ‘टाॅप’; ५८.३ कोटी डॉलर्सचा देशाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 06:52 AM2022-04-30T06:52:59+5:302022-04-30T06:53:36+5:30
गेल्या वर्षभरात भारतात १०६ वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी ८५ वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले
नवी दिल्ली : सर्वात जास्त वेळेस इंटरनेट ब्लॉक किंवा बंद करणाऱ्या देशांच्या यादीत भारत सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात भारतामध्ये तब्बल १०६ वेळेस इंटरनेट शटडाऊन करण्यात आले आहे.
सर्वांत जास्त वेळेस इंटरनेट शटडाउन केलेले देश
भारत - १०६, म्यानमार - १५, इराण - ०५, सुदान - ०५, क्युबा - ०४, जॉर्डन - ०४, इथिओपिया - ०३, युगांडा - ०३
कोणत्या राज्यात सर्वाधिक घटना
गेल्या वर्षभरात भारतात १०६ वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी ८५ वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये अधिकारी इंटरनेट व्यत्यय लादणे सुरू ठेवतात जो दीर्घकाळ कायम असतो, असे 'ॲक्सेस नाऊ'ने जारी केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
२०२१ मधील आकडेवारी
१८२ वेळा जगातील ३४ देशांमध्ये इंटरनेट बंदी घालण्यात आली होती.
५८.३ कोटी डॉलर्सचा भारताला फटका
या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या 'टॉप१०व्हीपीएन' या रिसर्च ग्रुपच्या अहवालानुसार, भारतातील केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशावरून झालेले इंटरनेट शटडाउन एकूण १,१५७ तास चालले होते. परिणामी २०२१ मध्ये ५८.३ कोटी डॉलर्सचा फटका बसला. तर, या इंटरनेट बंदीचा ५९ कोटी नागरिकांवर परिणाम झाला.