स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 08:25 PM2020-01-22T20:25:46+5:302020-01-22T20:26:35+5:30
परराष्ट्र मंत्रालयाने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केल्यापासून तो फरार आहे.
अहमदाबाद : भारतातून फरार झालेला स्वयंघोषित बाबा नित्यानंद याच्याविरोधात आता इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. गुजरात पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. गेल्या वर्षभरापासून नित्यानंद फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
नित्यानंद लहान मुलांचे अपहरण करून त्यांना अहमदाबाद येथील आश्रमात डांबून ठेवायचा आणि नंतर या मुलांना त्यांच्या अनुयायांसोबत दान गोळा करण्यासाठी पाठवायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. तसेच, त्याच्यावर कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केल्यापासून तो फरार आहे. त्यामुळे गुजरात पोलिसांनी इंटरपोलला त्याच्याविरूद्ध नोटीस जारी करण्याची विनंती केली होती.
Interpol has issued 'blue notice' against Nityananda on the request of Gujarat Police. A blue notice is issued to locate a person who is missing or is an identified or unidentified criminal or is wanted for a violation of ordinary criminal law.. pic.twitter.com/FhbYuA1azY
— ANI (@ANI) January 22, 2020
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात एक बेट विकत घेऊन तिथे स्वतंत्र देश स्थापन केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, या देशाचे कैलासा असे नामकरण करण्यात असून हे हिंदू राष्ट्र असल्याचे जाहीर केले गेल्याचे म्हटले जात आहे.
ब्ल्यू कॉर्नर नोटीस का दिली जाते?
इंटरपोलकडून त्यांच्या सदस्य देशांच्या गुन्हेगारांविरोधात वेगवेगळ्या नोटीसा जारी केल्या जातात. त्यात रेड कॉर्नर, ब्ल्यू, ब्लॅक, पर्पल, ऑरेंज आणि यलो नोटीसांचाही समावेश आहे. गुन्हेगार किंवा हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात येते. याशिवाय, गुन्हेगाराला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते.