खासदार कपिल पाटील यांची मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:03 AM2019-05-24T01:03:43+5:302019-05-24T01:04:15+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. पुढील पाच वर्षात मतदारसंघाच कोणत्या योजना राबवणार याबाबत पाटील साधलेला संवाद.
- पंढरीनाथ कुंभार
भिवंडी - लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. पुढील पाच वर्षात मतदारसंघाच कोणत्या योजना राबवणार याबाबत पाटील साधलेला संवाद...
विजयाचे श्रेय कोणाला देता?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सतत पाठिंबा देऊन भरघोस निधी दिला. केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघात २८ हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्यातून लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संघटनात्मक ताकदीबरोबरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सहकार्यामुळे विजय साकारला.
पुढील पाच वर्षांत कोणती कामे करणार?
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार उपचारासाठी एम्स रु ग्णालय, टेक्सटाइल पार्क, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प व कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, सर्व लोकल १५ डब्यांच्या करण्याबरोबरच लोकलच्या प्रवाशांना सुविधा मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
मेट्रोचा प्रश्न मार्गी लागणार का?
ठाण्याच्या कापूरबावडीपर्यंत आलेली मेट्रो भिवंडीमार्गे कल्याणमध्ये नेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यावर महिनाभरातच मुख्यमंत्री यांनी कार्यवाही करून मेट्रोला मंजुरी दिली होती. या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गी लागेल. त्याचबरोबर कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे कामही सुरू आहे.
वस्त्रोेद्योगाचा प्रश्न मार्गी लागणार का?
भिवंडीच्या वस्त्रोेद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्राने भिवंडीतूनच यंत्रमाग धोरणाची घोषणा केली होती. त्याचा अनेक जणांनी लाभ घेतला. सध्या यंत्रमागधारक विजेच्या जादा खर्चामुळे अडचणीत आहेत. त्यासाठी यंत्रमागधारकांना वीजपुरवठ्यात २७ एचपीऐवजी ५० एचपीपर्यंत अनुदान मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. भिवंडी स्मार्ट सिटी करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.