धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:10 PM2023-08-24T12:10:52+5:302023-08-24T12:11:37+5:30

चंदामामा ‘दूर’ के नव्हे, आता चंदामामा ‘टूर’ के! - पंतप्रधान मोदी

Intimidation curiosity and applause after success of Chandrayaan 3 Mission Moon Isro Bharatmata Ki Jai | धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चंद्रयान-३च्या सॉफ्ट लँडिंगचे लाइव्ह स्ट्रिमिंग देशात विविध ठिकाणी लोक पाहात होते. विद्यापीठे, महाविद्यालयांनी विद्यार्थी, शिक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्याची खास सोय केली होती. तशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांना करण्यात आली होती. चंद्रयान-३चे लँडिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांनीही एकच जल्लोष केला. इस्रोच्या अशा मोहिमांमुळे देशात विज्ञानाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होईल असे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सांगितले.

मोबाइलवर अनेकांनी पाहिले लाइव्ह स्ट्रिमिंग

देशात अनेक शहरे, तसेच गावांमध्ये लोक आपल्या मोबाइलवर चंद्रयान-३च्या सॉफ्टलँडिंगचे लाइव्ह स्ट्रिमिंग बघत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजल्यापासून असंख्य नागरिकांचे चंद्रयान-३च्या हालचालींकडेच लक्ष होते. मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा होताच नागरिकांनी जल्लोष केला. तसेच भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या.

विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर हे शब्द लोकांच्या तोंडी रुळले

चंद्रयान-१ व चंद्रयान-२च्या मोहिमेनंतर चंद्रयान-३कडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. चंद्रयान-३ला यश मिळाले तर भारत अंतराळ संशोधनात मोठी झेप घेईल याची जाणीव सर्वांनाच झाली होती. विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर हे शब्द अनेकांच्या तोंडी रुळले होते. इस्रोच्या मोहिमांमुळे भावी पिढ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.

चंद्रयान-3चे चंद्राच्या पृष्ठभागावर बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ तसेच देशभरातील नागरिकांनी एकच जल्लोष केला. अंतराळ संशोधनात भारताने घेतलेल्या भरारीने झालेला आनंद नागरिकांनी फटाके फोडून व्यक्त केला.

विक्रम लँडर असे उतरले चंद्रावर

इस्राेने विक्रम लॅंडर चंद्रावर उतरतानाची संपूर्ण प्रक्रिया ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवली. त्यावेळी अखेरच्या टप्प्यात विक्रम लॅंडरची स्थिती.

चंदामामा ‘दूर’ के नव्हे, आता चंदामामा ‘टूर’ के! - पंतप्रधान मोदी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘‘भारताने आता चंद्रावर पाऊल ठेवले आहे, हे साऱ्या मानवजातीचे यश आहे,’’ असे कौतुकाचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ‘चंद्रयान-३’च्या भव्य यशाबद्दल मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे आले असून, तिथून ते ‘चंद्रयान-३’च्या सॉफ्ट लँडिंगप्रसंगी लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये सर्वांसोबत सहभागी झाले. ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातातील तिरंगा राष्ट्रध्वज उंचावून आनंद व्यक्त केला. त्यानंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, ‘‘भारताने पृथ्वीवर संकल्प केला व चंद्रावर तो पूर्ण केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे धाडस आजवर कोणत्याही देशाने केले नव्हते. ती कामगिरी भारताने यशस्वी करून दाखविली आहे. भारत आता चंद्रावर दाखल झाला आहे. आता यापुढची वाटचाल ‘चंद्रपथावर’ होणार आहे.’’

मोदी म्हणाले की, चंद्रावर भारताने ठेवलेले पाऊल हे यश साऱ्या मानवजातीचे आहे. भारताकडे जी-२०चे अध्यक्षपद असतानाच्या काळात ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी होण्यासारखे मोठे यश प्राप्त झाले आहे. ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. विकसित भारताची ही नांदी आहे. नव्या भारताने घेतलेल्या नवभरारीचे आपण साक्षीदार आहोत. भारताने ‘चंद्रयान-३’च्या निमित्ताने नवा इतिहास रचला आहे.

जोहान्सबर्गमध्ये असलो तरी मन भारतातच होते...

ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी मी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे आलो आहे. तरीही माझे मन भारतामध्येच होते. ‘चंद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाल्याच्या क्षणाची मला प्रतीक्षा होती. ती आता पूर्ण झाली.

पंतप्रधान २६ ऑगस्टला इस्रोला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर इस्रोच्या मुख्यालयाला २६ ऑगस्ट रोजी भेट देण्याची शक्यता आहे. त्यावेळी ते इस्रो शास्त्रज्ञांची भेट घेऊन ‘चंद्रयान-३’च्या यशाबद्दल अधिक माहिती जाणून घेतील व शास्त्रज्ञांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतील. 

तो दिवस फार दूर नाही...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘‘चंद्राविषयीच्या सर्व गोष्टी, दंतकथा आता बदलण्याची शक्यता आहे. नवीन पिढी चंद्राबाबतच्या वाक्प्रचारांचे आता नव्याने अर्थ लावणार आहे. भारतातील कथांमध्ये पृथ्वीला आई व चंद्राला मामा असे संबोधण्यात येते. ‘चंदामामा दूर के’ असेही म्हणण्याची प्रथा आहे. पण आता लहान मुले ‘चंदामामा दूर के’ याच्याऐवजी ‘चंदामामा टूर के’ असे म्हणू लागतील आणि ते दिवस फार दूर नाहीत.’’

अंतराळातील भारताची चंद्रयान-३ ची यशोगाथा जग पाहत आहे. या मोहिमेला ऐतिहासिक यश मिळवून देण्यासाठी इस्रो आणि आमच्या शास्त्रज्ञांनी जे अथक प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोठी कामगिरी आहे. अनेक दशकांच्या प्रचंड कल्पकतेचे आणि शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. १९६२ पासून भारताचा अंतराळ कार्यक्रम नवीन उंची गाठत आहे आणि स्वप्ने पाहणाऱ्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

चंद्र मोहिमेच्या यशामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लॅण्डिंग करणाऱ्या देशांच्या निवडक गटात भारताचा समावेश झाला आहे. आज चंद्रावर चंद्रयान-३ चे यशस्वी लॅण्डिंग मी पाहिले. हे आपल्या महान राष्ट्राचा नागरिक म्हणून अभिमानास्पद आहे.
- धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश

आता भारत जगाला भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारे प्रगतीच्या मार्गावर नेईल. दक्षिण ध्रुवावर आमच्या शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ परिश्रमानंतर उतरण्याचा मान मिळवला आहे. हे संपूर्ण जगाच्या मानवतेसाठी आहे.
- मोहन भागवत, सरसंघचालक, आरएसएस.

Web Title: Intimidation curiosity and applause after success of Chandrayaan 3 Mission Moon Isro Bharatmata Ki Jai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.