असहिष्णूता भारतीयांच्या जगण्याचा भागच - विवेक देवरॉय
By admin | Published: November 5, 2015 10:37 AM2015-11-05T10:37:08+5:302015-11-05T10:40:24+5:30
भारतात फारपूर्वी पासून असहिष्णूता असून असहिष्णूता हा आपल्याकडे जगण्यातील एक भागच आहे असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी मांडले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भारतात फारपूर्वी पासून असहिष्णूता असून असहिष्णूता हा आपल्याकडे जगण्यातील एक भागच आहे असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी मांडले आहे. जी मंडळी देशात असहिष्णूता वाढत असल्याचा आरोप करत आहेत त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
निती आयोगाचे सदस्य आणि अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी असहिष्णूतेच्या मुद्द्यावर रोखठोख मतं मांडली. देशात पूर्वीपासूनच असहिष्णूता असल्याचा दावा करत देवरॉय यांनी काही उदाहरणंही दिली. जगदीश भागवती यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (डीएसइ) सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले होते कारण त्यांची विचारधारा वेगळी होती. डीएसइतील विचारधारा वेगळी असल्याने त्यांनी या विचारधारेचा नेहमीच विरोध दर्शवला होता. दुस-या पंचवार्षिक आयोगाच्या अभ्यासाठी अर्थतज्ज्ञांची समिती नेमली होती. यामध्ये डॉ. बी आर शेणॉय यांचाही समावेश होता. त्यांनी योजनेला विरोध दर्शवला होता. यानंतर शेणॉय यांचे नाव देशात कुठेच ऐकू आले नाही. त्यांच्यावर बंदी घालण्यात आली व शेवटी त्यांचा मृत्यूही श्रीलंकेतच झाला असे देवरॉय यांनी नमूद केले. पत्रकार अॅलेक्झेंडर कॅपबेल यांचे हार्ट ऑफ इंडिया हे पुस्तक होते. या पुस्तकाला सरंक्षण असले तरी आजही या पुस्तकावर भारतात बंदी आहे. या पुस्तकात नेहरु, समाजवाद याविषयी आक्षेपार्ह मत मांडण्यात आले होते. जी लोकं कोणतीही बंदी नको असे सांगतात त्यांनी कधीही हार्ट ऑफ इंडियावरील बंदीविरोधात आवाज उठवला नाही याकडेही देवरॉय यांनी लक्ष वेधले आहे.