नर्मदा नवनिर्माण अभियानाला बदनाम करण्याचा डाव: मेधा पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 08:12 AM2022-04-09T08:12:03+5:302022-04-09T08:12:26+5:30
नर्मदा नवनिर्माण अभियानने निधीचा गैरवापर केला व एकाच दिवशी मोठी रक्कम अभियानच्या खात्यामध्ये जमा झाल्याची बातमी धादांत खोटी असून अभियानला व अभियानच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा हा नियोजनपूर्ण कट असल्याचा आरोप
नवी दिल्ली :
नर्मदा नवनिर्माण अभियानने निधीचा गैरवापर केला व एकाच दिवशी मोठी रक्कम अभियानच्या खात्यामध्ये जमा झाल्याची बातमी धादांत खोटी असून अभियानला व अभियानच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा हा नियोजनपूर्ण कट असल्याचा आरोप नर्मदा नवनिर्माण अभियानच्या विश्वस्त व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.
पाटकर म्हणाल्या, की नर्मदा खोऱ्यात गेल्या ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्ष व नवनिर्माणाच्या कार्याला बदनामीचा हा डाव आहे. खोट्या व भ्रामक बातम्या पेरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वीही तसे प्रयत्न झालेले आहेत. तसे प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने चपराकही दिलेली आहे. माझगाव डॉकयार्ड कंपनीने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून नर्मदा नवनिर्माण अभियानद्वारे संचालित ७ जीवनशाळा तसेच वसतिगृहासाठी दोन वर्षे कार्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत निधी दिला आहे. या निधीचा संपूर्ण हिशेब माझगाव डॉकयार्ड कंपनीला सोपविला आहे.
या कंपनीने हा हिशेबाला मंजुरी सुद्धा दिलेली आहे. ईडी किंवा डीआरआयने एफआयआर नोंदविल्याची माहिती नाही. परंतु या संस्थांना तपासात सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील, असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे. परंतु धादांत खोट्या बातम्या पेरून नर्मदा नवनिर्माण अभियानाला बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करू, असा इशाराही मेधा पाटकर यांनी दिला.