आक्रमक काँग्रेसची संसदेत घोषणाबाजी
By admin | Published: December 8, 2015 11:24 PM2015-12-08T23:24:55+5:302015-12-08T23:24:55+5:30
नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण हा राजकीय सूडाचा प्रकार असल्याची भूमिका घेत संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी केली व जोरदार गोंधळ घातला.
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण हा राजकीय सूडाचा प्रकार असल्याची भूमिका घेत संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी केली व जोरदार गोंधळ घातला.
हे सर्व कशाचा निषेध म्हणून केले जात आहे, याविषयी अवाक्षरही त्यांनी काढले नाही. पक्षसदस्य सभागृहाच्या हौद्यात जाऊन आरडा-ओरड करीत होते तेव्हा सोनिया गांधी सभागृहात हजर होत्या.
हा सर्व गोंधळ कशासाठी सुरु आहे, अशी विचारणा लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केली. सोनिया गांधींच्या शेजारी बसलेले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खरगे अध्यक्षांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीत असलेले जाणवले. पण सोनिया गांधी यांनी त्यांना काहीही न बोलण्याचे खुणावले.
राज्यसभेतही उपसभापती पी. जे. कुरियन यांनी काँग्रेस सदस्यांकडे त्यांच्या वर्तनाचा खुलासा मागितला. तुमच्यापैकी एकाने उभे राहून तुम्ही का गोंधळ घालताहात ते सांगा. (विरोधी पक्षनेते ) गुलाम नबी आझाद यांना यावर काही बोलायचे आहे का?, कुरियन यांनी विचारले. पण आझाद किंवा काँग्रेसपैकी इतर कोणीही उपसभापतींचे शंकासमाधान केले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)जेटलींचे प्रत्युत्तर
संसदेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल काँग्रेसवर टीका करताना जेटली म्हणाले की, फौजदारी फिर्यादीतील आरोपी दोषी आहेत की निर्दोष याचा फैसला संसदेत किंवा प्रसिद्धी माध्यमांतून करायला भारत हा अनागोंदी कारभार असलेला देश नाही. सोनिया व राहुल गांधी यांनी न्यायालयापुढे जाऊन आपले निर्दोषित्व सिद्ध करावे. फौजदारी गुन्ह्यांचा आरोप करणारी खासगी फिर्याद दाखल केली गेली.
न्यायालयाला त्यात प्रथमदर्शनी तथ्य वाटले म्हणून समन्स काढले गेले. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात दाद मागितली पण तेथे समन्स कायम ठेवले गेले. त्यामुळे आता वरच्या न्यायालयात जाणे किंवा मूळ न्यायालयापुढे हजर होणे एवढेच आरोपींच्या हाती आहे.