भारतात गुंतवणूक करा, अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांना मोदींचं आवाहन
By admin | Published: June 26, 2017 12:22 AM2017-06-26T00:22:20+5:302017-06-26T06:17:51+5:30
भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सीईओंना केले. अमेरिकेतील प्रमुख २० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत मोदी यांनी रविवारी येथे चर्चा केली.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अमेरिका दौ-याच्या पहिल्या दिवशी जगभरातल्या 21 दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सीईओंना केले. पुढील महिन्यात भारतात जीएसटी लागू होत असून, त्यामुळे आर्थिक परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गत तीन वर्षांत भारताने सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) आकर्षित केले असल्याचे मोदी यांनी सांगितले. या बैठकीला अॅपलचे टिम कुक, गुगलचे सुंदर पिचाई आणि अमेझॉनचे जेफ बेजोस यांची उपस्थिती होती.‘मेक इन इंडिया’ मोहीम, ट्रम्प यांचे फर्स्ट अमेरिका धोरण, या आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.गेल्या तीन वर्षात भारताने सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आणली आहे, याकडेही बैठकीत मोदींनी लक्ष वेधलं. तीन वर्षांत सरकारने केलेली कामे आणि भविष्यातील योजना याबाबत मोदी यांनी माहिती दिली.
बैठकीनंतर सर्व कंपन्यांचे प्रतिनिधीही भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत, असं सुंदर पिचाई यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची होणार भेट-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान महत्वाच्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. तसेच यादरम्यान करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतासाठी 22 निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या या कराराबाबत चर्चा झाली आहे. आता या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान होणारा हा करार, जगाच्या दृष्टीने गेमचेंजर मानला जातो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्यात ड्रोन खरेदीचा करार सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. हा सौदा साधारण 130 ते 194 अरब डॉलर्सचा असणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांची चार वेळा भेट झाली होती.
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे. एच 1 बी व्हिसाचा विषय चर्चेचा भाग नसेल, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे. दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण व त्यासाठी अमेरिकेची मदत, संबंधांना बळकटी, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. त्याची माहिती निवेदनाद्वारे सर्वांना दिली जाणार आहे. ट्रम्प व मोदी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यानंतर नेदरलँडला जाणार आहेत. नेदरलँडमध्ये डच पंतप्रधान मार्क रट व राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेणार आहेत.