‘विरोधक ज्या सरकारी कंपनीला शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा, फायदा होईल’, नरेंद्र मोदींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:39 PM2023-08-10T18:39:05+5:302023-08-10T20:21:36+5:30
No Confidence motion : मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच एलआयसीबाबत केलेल्या भाकितांचा उल्लेख करत मोदींनी विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा फायदा होईल, असा सल्ला दिला.
मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मोदींनी विरोधी पक्षांना मिळालेल्या गुप्त वरदानाचा उल्लेख करताना तीन उदाहरणे दिली. तसेच एलआयसीबाबत केलेल्या भाकितांचा उल्लेख करत मोदींनी विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा फायदा होईल, असा सल्ला दिला.
मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांना सिक्रेट वरदान मिळालेलं आहे. हे लोक ज्यांचं वाईट चिंतितात त्यांचं भलं होतं. यांनी बँकिंग सेक्टर बरबाद होईल असं भाकित केलं होतं. मात्र आज आमच्या सरकारी बँकांचं नेट प्रॉफिट दुप्पटीने वाढलं आहे. HAL बाबतही यांनी असंच वाईटसाईट सांगितलं. मात्र आज HAL नव्या उंचीवर पोहोचलं आहे. HAL ने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे. तर एलआयसीबाबत काय काय सांगितलं गेलं. गरीबांचे पैसे बुडत आहेत. दरबारी मंडळींनी जे कागद हाती दिले. त्यावरून हे बोलत होते. मात्र आज एलआयसी सातत्याने मजबूत होत चालली आहे. त्यामुळे मी लोकांना सांगतो की, यापुढे विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा, फायदा होईल, असा टोलाही मोदींनी लगावला.
दरम्यान, मोदी म्हणाले की, पाच वर्षांत साडे तेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. देशाचं जे मंगल होतंय, जयजयकार होतोय. दिवसरात्र हे मला बोलतच असतात. मोदी तेरी कब्र खुदेगी, हा यांचा आवडता नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे हे अपशब्द टॉनिक आहे. हे असं का करतात, याचं सिक्रेट मी सांगू इच्छितो की, माझा ठाम विश्वास झाला आहे. विरोधी लोकांना एक सिक्रेट वरदान मिळालं आहे, ते म्हणजे, ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच होईल. एक उदाहरण माझ्या रुपाने आहेच, २० वर्षं झाली, काय-काय केलं गेलं...पण माझं भलंच झालं, असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.