लैंगिक छळाच्या प्रकरणांची चार आठवड्यांत चौकशी करा, केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:52 AM2020-01-19T03:52:56+5:302020-01-19T03:53:31+5:30
एसएआयच्या केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या ४५ पैकी २९ घटनांत प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एसएआय) २४ केंद्रांमध्ये २०१० ते २०१९ या कालावधीत लैंगिक छळाची ४५ प्रकरणे घडली. त्यापैकी प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची चौकशी चार आठवड्यांच्या आत पूर्ण करावी, असे आदेश केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी दिले आहेत.
रिजिजू यांनी सांगितले की, एसएआयच्या केंद्रांमध्ये लैंगिक छळाचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या प्रकरणांची शक्य तितक्या लवकर चौकशी व्हावी यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्यात येतील. ही माहिती एसएआयने एका निवेदनात दिली आहे.
एसएआयच्या केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या ४५ पैकी २९ घटनांत प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. जिमनॅस्टिक, अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान या घटना घडल्या होत्या. हा तपशील माहिती कायद्यान्वये केलेल्या एका अर्जाला एसएआयने दिलेल्या उत्तरातून उघड झाला आहे. यासंदर्भात एसएआयच्या एका माजी संचालकाने सांगितले की, खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या घटनांचा आकडा प्रत्यक्षात कितीतरी जास्त आहे.
एसएआयने म्हटले आहे की, २०११ ते २०१९ या कालावधीत विविध क्रीडाप्रकारांतील खेळाडूंनी लैंगिक छळ झाल्याच्या ३५ तक्रारी केल्या. त्यातील २७ तक्रारी प्रशिक्षकांच्या विरोधात आहेत. या प्रकरणांच्या चौकशीत दोषी आढळलेल्या १४ जणांना दंड ठोठावण्यात आला तसेच १५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अन्य प्रकरणांमध्ये काही जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली किंवा तक्रार दाखल झालेल्यांविरोधात सबळ पुरावे मिळू शकले नव्हते.
विनयभंगप्रकरणी चौकशीचे आदेश
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) देशभरातील २४ केंद्रांमध्ये दहा वर्षांत विनयभंगाची ४५ प्रकरणे पुढे आल्याचे एका अहवालात सांगण्यात आले होते. यावर केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार गंभीर असून याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दोषींना लहानसहान शिक्षा
एसएआय केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणांत पॉस्को कायदा तसेच कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी केलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे एसएआयने म्हटले आहे. मात्र, त्यातील बऱ्याच प्रकरणांत दोषींना लहानसहान शिक्षा देण्यात आल्या किंवा त्यांची बदली करण्यात आली असेही उजेडात आले होते. विविध क्रीडा प्रकारांची प्रशिक्षण शिबिरे एसएआय आयोजित करते. त्यात सहभागी होणाºया खेळाडूंना तक्रार नोंदविण्यासाठी एप्रिल २०१९पासून कॉल सेंटरही सुरू करण्यात आले.