गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा; भाजप खासदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 04:53 PM2020-02-17T16:53:43+5:302020-02-17T16:53:47+5:30
गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सतत गांधीजींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप पक्षातील नेत्यानेच आता गांधी हत्येची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार सुब्रमण्याम स्वामी यांनी ही मागणी केली आहे. तसेच गांधींना नथुराम गोडसेंने गोळी मारली होती, हे पूर्णपणे सिद्ध झालंच नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.
खासदार स्वामींनी ट्विट करून ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये गांधी हत्येच्या चौकशी संदर्भातील याचिका फेटाळून लावण्यात आली होती. ऑक्टोबर 2017 मध्ये आयटी क्षेत्रातील डॉ. पंकज कुसुमचंद्र यांनी याचिका दाखल केली होती. गांधी हत्येत गोडसेने चौथी गोळी मारली होती, यावर काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. पंकज यांनी याचिकेतून केली होती. आता पुन्हा न्यायालयाच्या आदेशावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.