नेत्याच्या दहशतवादी संबंधाची चौकशी करा; राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 06:38 AM2024-01-08T06:38:53+5:302024-01-08T06:39:39+5:30
ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल
कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याला तात्काळ अटक करण्याचे आणि दहशतवाद्यांसह त्याच्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
चिंता व्यक्त करताना बोस म्हणाले की, तृणमूल नेत्याने कदाचित मर्यादा ओलांडली असेल. शनिवारी रात्री उशिरा राजभवनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्यपालांनी पोलिस प्रमुखांना दोषीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ‘राजभवनच्या शांतता कक्षात शाहजहान शेखला काही पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही राजकारण्यांचे समर्थन असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, राज्यपालांनी पोलिस प्रमुखांना गुन्हेगाराला त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल
- राज्यपालांच्या टीकेला उत्तर देताना, तृणमूल प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, ‘त्यांच्या टिपण्यांचा आधार काय आहे, हे आम्हाला माहीत नाही.
- राज्यघटनेनुसार राज्यपाल राज्य सरकारशी सल्लामसलत करून काम करतात. मग कुठलाही ठोस अहवाल किंवा पुरावा नसताना ते अशी टिपणी कशी करू शकतात? ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत’.
- भाजपच्या बंगाल शाखेने, ईडी अधिकाऱ्यांवर जमावाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेत, सीमेपलीकडील घटक आणि रोहिंग्या निर्वासितांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.