कलबुर्गींच्या हत्येचा महाराष्ट्रातही तपास
By admin | Published: September 1, 2015 11:13 PM2015-09-01T23:13:59+5:302015-09-02T09:16:12+5:30
प्रख्यात कन्नड पुरोगामी विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग देताना कर्नाटक पोलिसांनी चार तपास पथकांकडे जबाबदारी सोपविली आहे
बंगळुरू : प्रख्यात कन्नड पुरोगामी विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग देताना कर्नाटक पोलिसांनी चार तपास पथकांकडे जबाबदारी सोपविली आहे. कलबुर्गी यांची रविवारी धारवाड येथे अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केल्यानंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
कर्नाटकच्या अन्य भागातही तपास चमू पाठविले जातील. याशिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे काय याची गांभीर्याने शहानिशा केली जाणार असल्याची माहिती हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त पी. एच. राणे यांनी दिली.
रोखठोक विधाने करीत पुरोगामी विचार मांडत ७७ वर्षीय कलबुर्गी यांनी कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचा रोष ओढवून घेतला होता. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांची हत्याही गोळ्या झाडून झाल्याने त्यातील साम्य हा तपासाचा विषय ठरू शकतो. या तिघांच्या हत्याकांडाचा परस्परांशी संबंध तपासला जाणार काय, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला होता.
अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणाऱ्या डॉ. दाभोलकर यांची पुण्यात २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. टोलविरोधात आंदोलन पुकारणाऱ्या पानसरे यांच्यावर यावर्षी १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. (वृत्तसंस्था)