मनमोहन सिंग यांचीही चौकशी
By admin | Published: December 17, 2014 01:21 AM2014-12-17T01:21:36+5:302014-12-17T01:21:36+5:30
कोळसा ब्लॉक वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे़
नवी दिल्ली : कोळसा ब्लॉक वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे़ आदित्य बिर्ला उद्योगसमूहातील हिंदाल्को कंपनीस केल्या गेलेल्या ओडिशातील दोन कोळसा खाणपट्ट्यांच्या वाटपातील गैरव्यवहारप्रकरणी मनमोहन सिंग यांचाही जबाब नोंदवा, असे आदेश विशेष न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत़
सन २००५ मध्ये हिंदाल्कोला तालाबीरा-२ या कोळसा खाणपट्ट्याचे वाटप केले गेले होते़ त्या वेळी कोळसा मंत्रालयाचा कार्यभार मनमोहन सिंग यांच्याकडे होता. सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता़ मात्र आज मंगळवारी विशेष न्यायाधीश भरत पराशर यांच्या न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सीबीआयकडे पाठवत पुढील चौकशीचे आदेश दिले़ तत्कालीन कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांचा विविध पैलूंवर आधी जबाब नोंदवणे योग्य ठरेल, असे सांगत न्यायालयाने सदर प्रकरणी आणखी चौकशीची गरज अधोरेखित केली़
माझ्या मते, कुणी काय गुन्हा केला याचा तपास व्हायला हवा़ तत्पूर्वी तत्कालीन कोळसा मंत्र्यांची या प्रकरणाच्या विविध पैलूंवर चौकशी होणे योग्य ठरेल़ मनमोहन सिंग यांच्याशिवाय पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) काम करणारे आणि हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा वाटप प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकतर चौकशी झाली नाही वा ती योग्यप्रकारे केली गेली नाही, याकडे न्यायालयाने सीबीआयचे लक्ष वेधले़ पंतप्रधानांचे खासगी सचिव राहिलेले बी़ व्ही़ आऱ सुब्रमण्यम यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही़ पीएमओतील तत्कालीन प्रधान सचिव टी़ के़ ए़ नायर यांना प्रश्नावली दिली गेली़ मात्र अंतत: त्यांनी त्यापुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थता व्यक्त केली़ त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी सुब्रमण्यम आणि नायर यांची चौकशी करणे योग्य होईल, असे न्यायालयाने सीबीआयला सुनावले़ तसेच येत्या २७ जानेवारीला तपासाबाबतचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले़ गत २५ नोव्हेंबरला न्यायालयाने सीबीआयला याचवरून फटकारले होते़ तत्कालीन कोळसा मंत्र्यांचे जबाब घेणे गरजेचे आहे, असे आपणाला वाटले नाही का, आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांचे जबाब तरी घेतले होते का, अशी विचारणा न्यायालयाने सीबीआयला केली होती़
सीबीआयने गतवर्षी आॅक्टोबरमध्ये बिर्ला, कोळसा खात्याचे माजी सचिव पी़ सी़ पारेख आणि अन्यविरुद्ध गुन्हा दाखल केला होता़ पारेख यांनी आधी हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा नाकारला होता़ मात्र काही महिन्यांनंतर मात्र आपला निर्णय पलटवत हिंदाल्कोवर ‘कृपादृष्टी’ दाखवली होती़ सीबीआयने याप्रकरणी या वर्षी २७ आॅगस्टला क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
> तत्कालीन कोळसा मंत्री या नात्याने मनमोहन सिंग यांची या प्रकरणात चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही आधीपासूनच लावून धरली होती़ न्यायालयाने आज नेमक्या याच गोष्टीचा पुनरुच्चार केला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ता संबीत पात्रा यांनी दिली़ न्यायालय कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत आदेश देत असेल तर त्याचे पालन व्हावे, असे भाजपा नेते नलिन कोहली म्हणाले़
> काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले़ न्यायालयीन आदेश येईपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू.हा आदेश तपासल्यानंतरच यावर योग्य प्रतिक्रिया देता येईल, असे तिवारी म्हणाले़
> माकपा नेते सीताराम येचुरी यांना प्रतिक्रिया विचारली असता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे़ कायदा आपले काम करेल़, असे
ते म्हणाले़