तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 06:40 AM2024-09-23T06:40:47+5:302024-09-23T06:42:01+5:30

आधी तपासणी, मगच केले जाहीर : चंद्राबाबू नायडू

Investigation of TTD Tirupati Ladoo case by SIT | तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी

तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी

अमरावती : देशभरात विविध स्तरातून मंदिरे आणि प्रसादांचे पावित्र्य संरक्षित करण्याची मागणी होत असताना तिरुमला तिरुपति देवस्थानममधील लाडू भेसळप्रकरणाच्या चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. पोलीस महानिरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश असेल, असे नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लाडू प्रकरणी खोटे पसरविल्याबद्दल नायडू यांना समज देण्याची मागणी केली. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे काळजीवाहक तिरुमला तिरूपती देवस्थानम् (टीटीडी) येथे तूप स्वीकारण्याच्या प्रक्रियेचे विवरण या आठ पानी पत्रात रेड्डी यांनी दिले.

देश आपल्याकडे पाहत आहे : जगनमोहन

"अशा निर्णायक क्षणी सर्व देश आपल्याकडे पाहत आहे. खोटे पसरविल्याबद्दल नायडू यांना कठोरपणे समज देणे, तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर येणेही गरजेचे आहे. त्यामुळे टीटीडीच्या पावित्र्यावर पुन्हा श्रद्धा बसू शकेल. 

आरोप झालेले तूप वेळीच नाकारण्यात आले आणि टीटीडीच्या परिसरात येऊच देण्यात आले नाही. असे असले तरी नायडू यांनी वाईट हेतूने हा प्रश्न पक्षाच्या १८ सप्टेंबरच्या बैठकीत उपस्थित केला," असे रेड्डी पत्रात म्हणाले.

तूप खरेदी प्रक्रियेत बरेच बदल : नायडू तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाडू आणि तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठिवले. सर्व पातळ्यांवरुन अहवाल आल्यानंतरच जाहीर केले, असे चंद्राबाबू नायडू म्हणाले. हा वाद मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी सुरू झाला होता. गेल्या सरकारने तूप खरेदी प्रक्रियेत बरेच बदल केल्याचेही नायडू म्हणाले. 

तुपावर जीपीएसची नजर : तिरुपति मंदिरात आता लाडू बनविण्यासाठी कर्नाटक दूध महासंघाच्या 'नंदिनी' या तुपाचा वापर केला जात आहे. ३५० टन तुपाचा पुरवठा करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावली आहे. 
 

Web Title: Investigation of TTD Tirupati Ladoo case by SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.