धनुष तोफेसाठी चिनी पार्ट्सचा पुरवठा, सीबीआयने सुरु केला तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 09:16 AM2017-07-22T09:16:57+5:302017-07-22T09:16:57+5:30
बोफोर्स तोफांच्या धर्तीवर देशातच बनवण्यात आलेल्या 155 एमएम धनुष तोफेसंबंधी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - बोफोर्स तोफांच्या धर्तीवर देशातच बनवण्यात आलेल्या 155 एमएम धनुष तोफेसंबंधी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनुष तोफांसाठी मेड इन जर्मनीच्या नावाखाली प्रत्यक्षात हलक्या दर्जाच्या चिनी पार्टसचा पुरवठा करण्यात आला आहे. सीबीआयने या प्रकरणी तपास सुरु केला असून, दिल्ली स्थित सिध सेल्स सिंडिकेट आणि जबलपूर येथील जीसीएफच्या अज्ञात अधिका-या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धनुष तोफेसाठी पाठवलेले चिनी पार्टस अत्यंत सुमार दर्जाचे आहेत. 1999 साली कारगिल युद्धाच्यावेळी लष्कराने बोफोर्स तोफांचा वापर केला होता. या तोफेच्या मारक क्षमतेमुळे त्यावेळी लष्कराला पाकिस्तानवर वर्चस्व मिळवता आले होते. त्यामुळे देशातच बोफोर्ससारखी तोफ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या संरक्षण तयारीच्या दुष्टीने धनुष तोफेचे उत्पादन आणि कामगिरी अत्यंत महत्वाची असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा
धनुष तोफेमध्ये चार बेयरिंगच्या ऑर्डरसाठी टेंडर काढण्यात आले. कुठल्याही फिरत्या मशीनला बेयरिंगची गरज लागते. 2013 मध्ये 35.38 लाखांची ऑर्डर सिध सेल्स सिडिंकेटला देण्यात आली होती. 27 ऑगस्ट 2014 रोजी पुन्हा ऑर्डरमध्ये वाढ करुन चारच्या जागी सहा बेअरिंगची ऑर्डर करण्यात आली. त्यावेळी किंमत वाढून 53.07 लाख झाली. एप्रिल 2014 ते ऑगस्ट 2014 दरम्यान बेयरिंगचा पुरवठा करण्यात आला. जे बेयरिंग पुरवण्यात आले ते मेड इन जर्मनी असल्याचे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ते मेड इन चायना असल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे.
महत्वाचे म्हणजे हे पार्ट मेड इन जर्मनी आहेत हे पटवून देण्यासाठी कंपनीने बनावट लेटरहेडचा वापर केला. जीएसएफने जेव्हा चाचणी घेतली तेव्हा हे बेअरिंग वापरणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने त्यावर स्पष्टीकरण दिले. उत्पादनात त्रुटी राहिल्यामुळे बेअरिंग योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे कंपनीने सांगितले. एकही अतिरिक्त पैसा न आकारता नवीन बेअरिंग बदलून देऊ आणि भविष्यात योग्य ती काळजी घेऊ असे कंपनीकडून सांगण्यात आले होते.