उधमपूर हल्ल्याचा तपास एनआयएकडे
By admin | Published: August 6, 2015 10:44 PM2015-08-06T22:44:53+5:302015-08-06T22:44:53+5:30
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गोपनीय सूचना मिळाली नव्हती
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गोपनीय सूचना मिळाली नव्हती, अशी माहिती दलातर्फे गुरुवारी देण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या हल्ल्याच्या तपासाची सूत्रे स्वीकारली आहेत. या हल्ल्यात जिवंत हाती लागलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याने आपण लष्कर-ए-तोयबाकडे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले असल्याचा दावा केला आहे.
हल्ल्यानंतर घटनास्थळाचा दौरा करणारे बीएसएफ प्रमुख देवेंद्र के. पाठक यांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचा परिसर तुलनात्मकदृष्ट््या सुरक्षित असून या क्षेत्रात मागील दोन दशकात अशा प्रकारचा हल्ला झालेला नाही.
जवानांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एकमेव सशस्त्र जवान २५ वर्षीय रॉकी याने दाखविलेल्या धाडसाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना जीवाचे बलिदान देणाऱ्या रॉकीने प्रत्युत्तरात गोळीबार करून दहशतवाद्यांना बसमध्ये शिरण्यापासून रोखले. त्याने दुर्दम्य साहसाचा परिचय देत आपल्या ४४ नि:शस्त्र सहकारी जवानांचे प्राण वाचविले. कारण हल्ला झाला त्यावेळी बसमधून प्रवास करणारा इतर कुठलाही जवान शस्त्रसज्ज नव्हता,असे पाठक म्हणाले.
एनआयएचे पथक जम्मूत
एनआयएचे महानिरीक्षक संजीवकुमार सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रीय तपास संस्थेचे पथक बुधवारीच जम्मूत डेरेदाखल झाले असून त्याने चकमक स्थळाचा दौराही केला.
लष्करकडून घेतले प्रशिक्षण
एनआयएच्या पथकाने रात्रभर नावेदची चौकशी केली. आपण लष्कर-ए-तोयबाच्या ‘दौर-ए-आम’ आणि ‘दौर-ए-खास’ या दोन प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रशिक्षण घेतले असल्याचे त्याने सांगितले. पहिल्या सत्रात शारीरिक व्यायाम, उंच पहाडांवर चढण्याचे कौशल्य आणि छोटी शस्त्रे वापरण्याच्या पद्धती शिकविल्या जाते तर दुसऱ्या सत्रात रायफल चालविणे आणि लहान स्फोटके तयार करण्याचे तंत्र सांगितले जाते.
नावेदच्या सांगण्यानुसार तो कुंपण कापून उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामार्गे भारतात शिरला. सुरुवातीला तो तंगमार्ग आणि बाबा रेशीत थांबला. त्यानंतर त्याने अवंतीपुरा-पुलवामा क्षेत्रात मुक्काम केला. येथे तो पहाडांमधील गुफेत दडून बसला होता. या ठिकाणी दहशतवादी दोन गटात विभाजित झाले. नावेद आणि नोमान दक्षिण काश्मीरच्या कुलवामला गेले. तेथून ते जम्मूला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये बसले. रात्री पाटनीटॉपला राहिल्यानंतर उधमपूरला उतरले.
शहानिशा करण्याकरिता नावेदने सांगितलेल्या सर्व ठिकाणांवर त्याला नेण्यात येईल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)