काँग्रेस अधिवेशनासाठी निष्ठावंतांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:20 AM2018-03-17T06:20:17+5:302018-03-17T06:20:17+5:30
अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य व प्रदेश काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींचा पक्षाच्या अधिवेशनावर असलेला वरचष्मा दूर करण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य व प्रदेश काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींचा पक्षाच्या अधिवेशनावर असलेला वरचष्मा दूर करण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे. गाव तसेच ब्लॉक स्तरावरील निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांना दिल्लीत आयोजिलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांनी आमंत्रित केले आहे. पक्षाच्या अधिवेशनाच्या
इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, प्रदेश काँग्रेस समिती सदस्यांव्यतिरिक्त गाव व
ब्लॉक स्तरावरील जे कार्यकर्ते कधीही काँग्रेस पक्ष सोडून गेले नाहीत, त्यांची माहिती मिळविण्याचे आदेश राहुल गांधी यांनी विविध राज्यांचे प्रभारीपद सांभाळणाऱ्या पक्षाच्या महासचिवांना दिले. छोट्या राज्यांतून १० व मोठ्या राज्यांतून १५ निष्ठावान कार्यकर्त्यांना दिल्लीतील अधिवेशनास बोलाविण्याचे ठरले आहे. मात्र त्यांची माहिती जमविण्यात येत असल्याची कल्पना सुरवातीला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी राज्यांना नव्हती. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहाता येणे शक्य नव्हते. ही बाब राहुल गांधी यांना कळल्यानंतर
त्यांनी संबंधित राज्यांच्या प्रभारी महासचिवांची कानउघाडणी केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना अधिवेशनाला
घेऊन येण्याचे आदेश गुरुवारी रात्री त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिले. त्यामुळे युद्धपातळीवर शोधाशोध करुन विविध राज्यांतील काँग्रेस
प्रदेशाध्यक्षांनी गाव व ब्लॉक स्तरावरील २०० निष्ठावंत कार्यकर्ते शोधून काढले. ते सर्व दिल्लीतील अधिवेशनाला उपस्थित राहतील.