पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण
By Admin | Published: March 23, 2015 12:53 PM2015-03-23T12:53:22+5:302015-03-23T13:03:18+5:30
पाकिस्तान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी फुटीरतावादी नेता मसरत आलमला निमंत्रण दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पाकिस्तान डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी फुटीरतावादी नेता मसरत आलम याला निमंत्रण देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडून मसरत आलमला या समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले होते मात्र त्याने समारंभास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण या कार्यक्रमास जाऊ शकत नसल्याचे मसरत आलमने स्पष्ट केले.
मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयामुळे नुकताच गदारोळ माजला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यात मसरत आलमचाही समावेश होता. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणा-या तत्कालीन सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका झाली. तसचे विरोधकांनी केंद्र सरकारवरही टीका करत या निर्णयाचा निषेध केला होता. आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही विरोधकांनी सभागृहात केली होती, या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बराच काळ ठप्प झाले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच पाकिस्तान डेच्या समारंभासाठी मसरत आलमला निमंत्रण देण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पाकिस्तान दिनासाठी फुटीरतावाद्यांना निमंत्रण मिळणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. सरकारने याविरोधात कठोर पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेने केली असून दिल्लीत पाकिस्तान दिनाविरोधात निदर्शने करण्यात आली.