अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ, रजनीकांत यांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:46 AM2023-12-19T05:46:30+5:302023-12-19T05:46:38+5:30
उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा यांचा निमंत्रितांमध्ये समावेश
- त्रियुग नारायण तिवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अयोध्या : उत्तर प्रदेशमधील अयोध्येत रामजन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात २३ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व पूर्वतयारी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, अरुण गोविल, अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिग्दर्शक मधुर भांडारकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत आदी मान्यवरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध परंपरांचे १५० साधुसंत तसेच १३ आखाड्यांचे साधुसंत तसेच सहा दर्शन परंपरांचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत तीनहून अधिक ठिकाणी पाहुण्यांची निवासव्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय विविध मठमंदिरांमध्ये व अयोध्येतील रहिवाशांची घरे अशा ठिकाणी मिळून ६०० खोल्या उपलब्ध झाल्या आहेत. तिथेही पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सांगितले.
अडवाणी, मुरली मनोहर जोशी राहणार अनुपस्थित
प्रकृतीच्या कारणापायी व वृध्दापकाळामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी व भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे भगवान रामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहू शकणार नाहीत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना निमंत्रण देण्यासाठी तीन जणांची समिती नेमण्यात आली होती, अशी माहिती चंपतराय यांनी दिली.
२३ जानेवारीपासून भाविकांना दर्शनाची सुविधा
ट्रस्टचे महासचिव चंपतराय म्हणाले की, भगवान रामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १६ जानेवारी रोजी पूजेला प्रारंभ होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर उत्तर भारतातील परंपरेनुसार २४ ते ४८ दिवसांचे मंडल पूजन होईल. २३ जानेवारीपासून या मंदिरात भाविक रामलल्लाचे दर्शन घेऊ शकणार आहेत.