होय, कार्ती चिदंबरमला लाच दिली होती; इंद्राणी मुखर्जी जबाबावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:30 AM2018-03-05T09:30:45+5:302018-03-05T09:30:45+5:30
भायखळा कारागृहात एका खोलीत कार्तीला इंद्राणीसमोर बसविण्यात आले. त्यांची तब्बल चार तास चौकशी केली.
मुंबई: आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा कारागृहात आणलं होतं. सव्वाअकराच्या सुमारास भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले. या ठिकाणी एका खोलीत कार्तीला इंद्राणीसमोर बसविण्यात आले. त्यांची तब्बल चार तास चौकशी केली. इंद्राणीने दिलेल्या माहितीवरून कार्तीकडे विचारणा करण्यात आली. आयएनएक्स प्रकरणी त्यांच्यामध्ये झालेली चर्चा, व्यवहाराच्या अनुषंगाने सुमारे चार तास प्रश्नोत्तरे झाली. त्यांच्या संभाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग घेण्यात आले. यावेळी कार्ती चिदंबरमला लाच दिल्याच्या आपल्या विधानावर इंद्राणी मुखर्जी कायम राहिली. कार्ती चिदंबरमने लाच मागितली होती आणि त्याला लाच देण्यात आली होती, या विधानावर इंद्राणी ठाम राहिली. तसंच कोर्टातही हाच जबाब देईल असं तिने म्हटल्याची माहिती आहे.
चार तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास कार्तीला घेऊन सीबीआयचं पथक जेलमधून बाहेर पडले. या वेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी सीबीआय अधिका-यांकडे चौकशीबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार देत ते विमानतळाच्या दिशेने निघून गेले. सायंकाळच्या विमानाने पथक दिल्लीकडे रवाना झाले.
शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी गेल्या अडीच वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपासही सीबीआय करीत आहे. 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी कार्ती चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून देऊ, असे कार्तीने आपल्याला सांगितले होते, असा जबाब तिने 17 फेब्रुवारीला महानगर दंडाधिका-यांसमोर दिला आहे. त्यानंतर कार्तीविरुद्ध फास आवळून सीबीआयने चार दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली.