INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 09:48 AM2019-08-26T09:48:18+5:302019-08-26T09:49:02+5:30
दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता.
न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टातील खंडपीठ पी. चिदंबरम यांच्या नवीन याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांची अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली होती. या निर्णयाला आव्हान देत पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी गेल्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी अशक्य असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. सीबीआयने गेल्या बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील सुनावणीसाठी गुरुवारी पी. चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. पी. चिदंबरम या प्रकरणातील चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.