पेट्रोलऐवजी कारमध्ये डिझेल भरलं, प्रकरण पोहोचलं कोर्टात, दोन वर्षांनंतर मिळाला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:39 PM2024-08-12T13:39:00+5:302024-08-12T13:39:45+5:30
हे प्रकरण तेलंगणातील वारंगल येथील असून ३० जुलै २०२२ रोजी घडलं होतं.
हैदराबाद : पेट्रोल पंपावरील एक छोटीशी चूक तेल कंपनीला महागात पडली. दरम्यान, कारमध्येपेट्रोलऐवजी डिझेल भरण्यात आलं, त्यामुळं कारचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी जिल्हा ग्राहक न्यायालयानं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला २६ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितलं. हे प्रकरण तेलंगणातील वारंगल येथील असून ३० जुलै २०२२ रोजी घडलं होतं.
याप्रकरणी मीनाक्षी नायडू नावाच्या महिलेनं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ससी फ्यूल फिलिंग स्टेशन म्हणजेच पेट्रोल पंपचालकाविरोधात ही तक्रार केली होती. ३० जुलै २०२० रोजी ही महिला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेली होती. TOI च्या रिपोर्टनुसार, तक्रारदार महिलेचं म्हणणे आहे की, तिनं पेट्रोल पंपावर असलेल्या व्यक्तीला १००० रुपयांचं पेट्रोल भरण्यास सांगितलं आणि तिनं डेबिट कार्डद्वारे पैसे दिले.
महिलेचा आरोप आहे की, पेट्रोल भरल्यानंतर १० मिनिटांनी तिची कार सुरू होण्यास अडचण निर्माण झाली. यावेळी इंजिनमधून मोठा आवाज येऊ लागला आणि गाडी नीट चालत नव्हती. या महिलेनं मोठ्या कष्टानं कार चालवत हैदराबाद गाठलं. यानंतर महिलेनं कार अधिकृत सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली. या सेंटरमध्ये कार तपासणी केल्यानंतर पेट्रोलऐवजी कारमध्ये डिझेल भरल्यानं कारचं नुकसान झालं असून दुरुस्तीसाठी ६३८१ रुपये खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं.
यानंतर महिलेनं पेट्रोल पंपचालकाविरोधात तक्रार दाखल केली. इंधनाच्या टाकीवर पेट्रोलचं स्टिकर असूनही त्यात डिझेल भरल्याचं महिलेनं सांगितलं. या प्रकरणात, पेट्रोल पंप व्यवस्थापनानं महिलेच्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं की, जर त्यांच्यासोबत असं घडलं असेल तर त्यांनी त्वरित तक्रार करायला हवी होती. यानंतर हे प्रकरण जिल्हा ग्राहक न्यायालयात पोहोचलं. ग्राहक न्यायालयात प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयानं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला तक्रारदाराला या निष्काळजीपणाबद्दल २६,००० रुपये भरपाई देण्यास सांगितलं.