एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 01:33 PM2019-12-26T13:33:47+5:302019-12-26T13:40:05+5:30
एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक आर्थिक विवंचनेत
नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाच्या वैमानिकांनी आता थेट मोदी सरकारला पत्र लिहून त्यांची व्यथा मांडली आहे. नोटीस पीरियड संपवण्याची आणि थकीत वेतन देण्याची मागणी वैमानिकांकडून करण्यात आली आहे. एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक काम करण्याच्या स्थितीत नसल्याचं इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशननं (आयसीपीए) पत्रात नमूद केलं आहे.
आयसीपीएनं नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनादेखील पत्र पाठवून त्यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. '३१ मार्च २०२० पर्यंत एअर इंडियाचं खासगीकरण न झाल्यास ही कंपनी बंद होईल, हे तुमचं विधान अतिशय चिंताजनक आहे,' असं आयसीपीएनं पत्रात म्हटलं आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना देण्यात येणारी वेठबिगारासारखी वागणूक बंद करावी, अशी मागणीदेखील पत्रातून करण्यात आली आहे.
'वैमानिकांना वेठबिगारासारखं वागवणं बंद करा. त्यांना किमान नोटीस पीरियड न देता एअर इंडिया सोडण्याची परवानगी द्या. याशिवाय त्यांचं रखडलेलं वेतनदेखील लवकरात लवकर द्या,' अशा मागण्या पत्रातून करण्यात आल्या आहेत. वेतन वेळेवर मिळत नसल्यानं अनेक कर्मचारी ईएमआयदेखील भरू शकत नसल्याचं युनियननं म्हटलं आहे. उड्डाण भत्ता मिळत नसल्यानं प्रचंड नुकसान होत आहे. कारण हा भत्ता वैमानिकांच्या एकूण वेतनाच्या ७० टक्के इतका असतो, असंदेखील आयसीपीएनं पत्रात नमूद केलं आहे. जवळपास ८०० वैमानिक या संघटनेचे सदस्य आहेत.