मुंबई, चेन्नईसह 'ही' शहरं बुडण्याचा धोका; ४ कोटी भारतीयांसाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:38 PM2022-03-15T16:38:49+5:302022-03-15T16:43:04+5:30
वातावरण बदलाचा, तापमान वाढीचा मोठा फटका बसणार; कोट्यवधी भारतीयांवर मोठं संकट
वातावरण बदलाचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) ताज्या अहवालातून भारतासाठी अतिशय चिंताजनक माहिती समोर आली आहे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो. शतकाच्या शेवटापर्यंत भारतातील ४.५ ते ५ कोटी लोकांवर मोठं संकट असेल. मुंबई, चेन्नई, गोवा यासारखे समुद्र किनारी असलेले भाग बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. भारताच्या तीन बाजूंना समुद्र आहे. भारताला लाभलेला समुद्र किनारा ७,५१६ किलोमीटरचा आहे. या किनारपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कोट्यवधी लोकांना समुद्राची पाणी पातळी वाढल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
सध्याच्या तापमानवाढीचा वेग लक्षात घेतल्यास मुंबई, चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, ओदिशा यांचा बराचसा भूभाग पाण्याखाली जाईल. या शहरांजवळ असलेल्या पाण्याचं तापमान ०.८ डिग्रीनं वाढल्यावर चक्रीवादळांची संख्या वाढेल. त्यांची तीव्रता वाढेल. वारंवार चक्रीवादळ येत राहतील. त्यामुळे मोठं नुकसान होईल. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा फटका बसत राहील.
समुद्राचं तापमान वाढत असल्याचा थेट परिणाम किनाऱ्यावर असलेल्या शहरांना सहन करावा लागेल. उष्णतेच्या लाटा येतील, मुसळधार पाऊस होईल. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्यानं काही भागांमध्ये परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे जाईल. दिल्ली, पाटणा, लखनऊ, हैदराबादमध्ये तापमान वाढेल. उष्णतेनं जीवाची काहिली होईल. थंडीच्या दिवसात पारा खूप घसरले. त्यामुळे थंडी असह्य होईल, असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो.