बंगळुरूत एप्रिलपासून सुरू होणार आयफोनचे उत्पादन
By Admin | Published: January 2, 2017 05:31 PM2017-01-02T17:31:27+5:302017-01-02T17:31:27+5:30
अॅपल कंपनी लवकरच भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 2 - अॅपल कंपनी लवकरच भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीनं बंगळुरू येथे आयफोन उत्पादन सुरू करण्याची घोषणा अॅपलने केली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. अॅपलसाठी ओईएमचे (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर) काम करणारी तैवानस्थित कंपनी विस्ट्रॉन बंगळुरूमधील पिन्या येथे औद्योगिक वसाहतीत आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. एप्रिल महिन्यात उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतात उत्पादन सुरू करण्यासंदर्भात अॅपल कंपनी खूप गंभीर आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत मोबाइलचे संपूर्ण उत्पादन करण्यासाठी अॅपल कंपनी प्रयत्नशील राहणार आहे. बंगळुरूत अॅपल कंपनी जातीनं लक्ष घालणार असल्याची माहिती कंपनीच्या विविध सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र उत्पादन भारतात विकण्यासाठी अॅपल कंपनीला 12.5 टक्के आयात कर भरावा लागणार आहे. तैवानस्थित अॅपलची सहयोगी उत्पादक कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने यापूर्वी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. पण या प्रकल्पात फक्त अॅपलचे उत्पादन तयार होणार असल्याचंही कंपनीनं सुरुवातीला सांगितले होते.
मात्र त्यानंतर फॉक्सकॉनने इतर प्रतिस्पर्धी जिओमी आणि वन प्लस या मोबाईल बनवणा-या कंपन्यांशीही करार केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे इथे अॅपलसोबत इतरही कंपन्यांचे मोबाईल बनवण्याची शक्यता आहे. अॅपल मोबाइलचे डिझाइन आणि डेव्हलपमेंट ऐक्सेलरेटर (उत्प्रेरक) आयओएस डेव्हलपर समुदायाला विकसित करण्यासाठी देणार आहे. तसेच भारतीय डेव्हलपर्सना मार्गदर्शनासाठी अॅपलची प्रोग्रॅमिंग भाषा जलद समजून अॅपल टीव्ही, अॅपल घड्याळ बनवण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. यंदा लवकरच ही सेवा लोकांच्या वापरात येणार आहे.