शाब्बास पोरी! वयाच्या ५ व्या वर्षी आई-वडील गमावले, खचली नाही; सेल्फ स्टडी करून झाली IPS
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 04:15 PM2024-07-15T16:15:48+5:302024-07-15T16:29:00+5:30
IPS Anshika Jain : आई-वडील गेल्यानंतर काका आणि आजीने अंशिका यांना मोठं केलं. अंशिका यांनी मोठी अधिकारी व्हावं असं त्यांच्या आजीचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी ते पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
काही लोकांना अगदी लहान वयात खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं, परंतु ही परिस्थिती त्यांना अधिक मजबूत बनवते. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. IPS अंशिका जैन यांच्या जिद्दीला तुम्ही सलाम कराल. दिल्लीची रहिवासी असलेल्या अंशिका यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपले आई-वडील गमावले होते.
आई-वडील गेल्यानंतर काका आणि आजीने अंशिका यांना मोठं केलं. अंशिका यांनी मोठी अधिकारी व्हावं असं त्यांच्या आजीचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी ते पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. शिक्षिका असल्याने अंशिका यांच्या आजीने लहान वयातच त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून बीकॉम पूर्ण केलं. याच दरम्यान यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.
ग्रॅज्युएशननंतर अंशिका यांना देशातील एका प्रसिद्ध मल्टीनॅशनल कंपनीत चांगली नोकरी मिळाली, पण त्यांनी ती नाकारली आणि तिच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. दुर्दैवाने, २०१९ मध्ये परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांनी आजी देखील गमावली. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता, कारण त्यांनी त्यांची सपोर्ट सिस्टम गमावली होती. पण स्वतःला सावरलं आणि पुन्हा अभ्यास सुरू केला.
परीक्षेची तयारी करण्यासाठी सेल्फ स्टडीवर जोर दिला. पण चार प्रयत्नांत त्या परीक्षा उत्तीर्ण करू शकल्या नाहीत. अखेर मेहनत फळाला आली. पाचव्या प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश संपादन केलं. ऑल इंडिया रँक ३०६ मिळवून त्यांनी भारतीय पोलीस सेवेत अधिकारी पद मिळवलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा रंगली. कारण २०२३ मध्ये IAS अधिकारी वासू जैन यांच्याशी लग्न केलं आहे.