दबंग IPS अधिकारी शिवदीप लांडेंचा राजीनामा मंजूर; केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली अधिसूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:35 IST2025-01-18T18:34:29+5:302025-01-18T18:35:25+5:30
Shivdeep Lande: महाराष्ट्राचे सूपुत्र IPS शिवदीप लांडे यांच्या नावाने बिहारचे गुंड थरथर कापायचे.

दबंग IPS अधिकारी शिवदीप लांडेंचा राजीनामा मंजूर; केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली अधिसूचना
IPS Shivdeep Lande:बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दबंग पोलिस अधिकारी, अशी ओळख असलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयजी शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनाने त्याची अधिसूचनाही जारी केली आहे. शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, 19 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी पूर्णिया आयजी पदावर कार्यरत असताना पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. यासंबंधीचे पत्र पोलिस मुख्यालयाला पाठवण्यात आले होते, त्यानंतर अर्जावर विचार सुरू होता. त्यांचा राजीनामा मुख्य सचिवांमार्फत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला, जिथे तो मंजूर करण्यात आला. राजीनाम्याची माहिती खुद्द शिवदीप लांडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली होती. मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान असेल, असे त्यांनी सांगितले होते.
राजीनामा का दिला?
मूळ महाराष्ट्रातील असलेले, पण बिहारमध्ये सेवा देणारे सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. दबंग पोलिस अधिकारी, अशी ओळख असलेल्या शिवदीप लांडेंनी अचानक राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ते प्रशांत किशोर यांच्या पक्षातून राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. पण, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे स्वतः लांडेंनी जाहीर केले. आता ते पुढे काय करणार, हे लवकरच कळेल.