करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:01 PM2024-06-13T13:01:37+5:302024-06-13T13:03:53+5:30
Pooja Yadav : लहान मुलांचे ट्यूशन्स घेणं, रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणं, पार्ट टाईम जॉब करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी करत तरुणीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे
एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. लहान मुलांचे ट्यूशन्स घेणं, रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणं, पार्ट टाईम जॉब करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी करत तरुणीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. तिने जर्मनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षा उत्तीर्ण होत ती IPS अधिकारी झाली. पूजा यादव असं नाव आहे.
पूजा यादव यांचा जन्म २० सप्टेंबर १९८८ रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी आपलं शिक्षणही तेथेच पूर्ण केलं. यानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केल्यानंतर जर्मनी आणि कॅनडामध्येही नोकरी केली. काही काळ काम केल्यावर पूजा यांना समजलं की ती भारताऐवजी दुसऱ्या देशाच्या विकासात योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
पूजा यांनी परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. मात्र, त्यांना झटपट यश मिळालं नाही. २०१८ ची नागरी सेवा परीक्षा त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांना ऑल इंडिया रँक १७४ मिळाला आहे. आता त्या प्रतिष्ठित गुजरात केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पूजा यादव UPSC ची तयारी करत असताना किंवा MTech चे शिक्षण घेत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी नेहमीच पाठिंबा दिला.
घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. आपल्या शिक्षणाचा खर्च करावा यावा म्हणून मुलांचे ट्यूशन्स घेतले. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी आयपीएस अधिकाऱ्याने आयएएस विकास भारद्वाज यांच्याशी लग्न केलं. दोघेही मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पहिल्यांदा भेटले होते.
पूजा यादव या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे ३२४ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांचा विश्वास आहे की लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि विचार शेअर करण्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात प्रभावी प्लॅटफॉर्म आहे.