इकबाल कासकर खंडणी प्रकरण; दाऊदचा हात आढळल्यास त्यालाही आरोपी करणार : ठाणे पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 12:34 PM2017-09-19T12:34:31+5:302017-09-19T17:23:01+5:30

इकबाल कासकरला आज कोर्टात हजर केलं जाणार, या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू

Iqbal Kaskar tribute case; If the hand of Dawood is found, he will also be accused: Thane Police Commissioner | इकबाल कासकर खंडणी प्रकरण; दाऊदचा हात आढळल्यास त्यालाही आरोपी करणार : ठाणे पोलीस आयुक्त

इकबाल कासकर खंडणी प्रकरण; दाऊदचा हात आढळल्यास त्यालाही आरोपी करणार : ठाणे पोलीस आयुक्त

Next

ठाणे, दि. 19 - बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरला तीन साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी (18 सप्टेंंबर) रात्री उशीरा भायखळा येथून अटक केली. इकबाल कासकरला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. इकबाल कासकरने बिल्डरकडे चार फ्लॅटच्या स्वरुपात खंडणी मागितली होती, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे, दाऊदचा सहभाग आढळल्यास त्यालाही या प्रकरणात आऱोपी केलं जाईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.  

बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. ठाणे येथील खंडणीविरोधी पथकात चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांची अलीकडेच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कासकर याला अटक करून मोठी कारवाई केली आहे. कासकर याने ठाण्यातील बिल्डर खेतवानी यांच्याकडून खंडणीपोटी चार सदनिका वसूल केल्या होत्या. मात्र, त्याची भूक काही कमी न झाल्याने व तो आणखी सदनिकांची मागणी करत असल्याने बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शर्मा यांनी भायखळा येथील कासकरच्या घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. कासकरला अटक करण्यासाठी तब्बल ४0 पोलीस, ८ कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा पोलिसांनी वापरला होता.
खेतवानी यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच खेतवानी यांना खंडणी मागण्यात आली होती.

कासकर हा २००३ पर्यंत दुबईत वास्तव्य करीत होता. १९ मार्च २००३ रोजी त्याला विमानतळावर अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला. दाऊदचे रिअल इस्टेटमधील व्यवहार सांभाळणा-या कासकरची २००७ मध्ये वेगवेगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी मुक्तता झाली. २०१० मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळला. भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर भायखळा येथील डाबरवाला ही धोकादायक इमारत रिकामी करण्याचे आदेश महसूल विभागने दिले होते. त्यातच इमारतीत कासकर हा बेकायदा राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काही पुढारीही रडारवर
खंडणीच्या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावेही समोर आल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला. इकबाल कासकर आणि त्याच्या हस्तकांना या नेत्यांनी मदत केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रथदर्शनी 3 ते 4 राजकीय नेत्यांचा सहभाग दिसत असून, त्यामध्ये काही नगरसेवक आणि काही त्यापेक्षाही जास्त वजनदार नेत्यांचा समावेश असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले.

Web Title: Iqbal Kaskar tribute case; If the hand of Dawood is found, he will also be accused: Thane Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.