US-Iran Tension : तणाव निवळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने भारताकडे मागितला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:02 PM2020-01-08T16:02:58+5:302020-01-08T19:29:43+5:30
US-Iran Tension : कासिम सुलेमानींच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेदरम्यान निर्माण झालेला तणाव शिगेला पोहोचला आहे.
नवी दिल्ली - अमेरिका आणि इराणमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशात शांतता कायम रहावी यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन इराणकडून करण्यात आले आहे. अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारताने पुढाकार घेऊन दिलेल्या कुठल्याही प्रस्तावाचे इराण स्वागत करेल, असे इराणच्या भारतातील राजदुतांनी म्हटले आहे.
इराणच्या राजदुतांनी स्पष्ट शब्दात भारताकडे मध्यस्थीसाठी मदत मागितलेली नाही. मात्र त्यांनी याबाबत नकारही दिलेला नाही. कासिम सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इराणच्या नवी दिल्लीतील दुतावासामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इराणचे भारतातील राजदूत अली चेगेनी म्हणाले की, "जगात शांतता कायम ठेवण्यामध्ये भारताकडून नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली जाते. तसाच भारताचा या प्रदेशाशी संबंधही आहे. तणाव कमी होण्याच्या दृष्टीने जगातील सर्व देशांकडून विशेषत: भारताकडून एक चांगला मित्र म्हणून देण्यात येणाऱ्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करू,''
VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; कमांडर सुलेमानींच्या हत्येचा बदला
अमेरिकेच्या तळांवर डागली 22 क्षेपणास्रे, 80 सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा
Ukraine Plane Crash : युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा मृत्यू
त्यांनी पुढे सांगितले की, '' आम्हालाही युद्ध नको आहे. या भागात सर्वांसाठी शांतता प्रस्थापित व्हावी आणि समृद्धी यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शांतता आणि समृद्धीसाठी भारताकडून उचलण्यात येणाऱ्या कुठल्याही पावलाचे आम्ही स्वागत करू,''
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना 'सुपुर्द ए खाक' केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या तळांवर एकूण 22 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यात 80 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.
मंगळवारी रात्री इराणने क्षेपणास्रांद्वारे हल्ला करत अमेरिकेच्या इराकमधील तळांना लक्ष्य केले होते. दरम्यान, इराणकडून क्षेपणास्रांद्वारे अमेरिकेच्या तळांवर हल्ले झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेकडून दुजोरा देण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत पेंटागॉनकडून माहिती घेतली जात आहे.