चित्रपट पुरस्कार वादाचा फटका बसला इराणींना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:16 AM2018-05-15T05:16:37+5:302018-05-15T05:16:37+5:30
काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपट पुरस्काराच्या वादाचा फटका स्मृति इराणी यांना बसला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण खातेच काढून घेण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपट पुरस्काराच्या वादाचा फटका स्मृति इराणी यांना बसला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण खातेच काढून घेण्यात आले आहेत.
इराणींकडे आता त्यांच्याकडे फक्त वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी असेल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ््याच्या वेळी राष्ट्रपती केवळ एक तासच या समारंभास उपस्थित राहाणार हे जाहीर झाल्यामुळे वाद पेटला होता. अनेक कलाकारांनी राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार घेऊ नाहीतर समारंभावर बहिष्कार घालू अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी हा वाद तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री स्मृति इराणींना नीट हाताळता आला नाही. या प्रकरणी राष्ट्रपतींचीच भूमिका चुकीची आहे अशा स्वरुपाच्या बातम्या झळकल्या. तसेच या वादामुळे मोदी सरकारही अडचणीत आले. त्यामुळेही इराणी यांचे माहिती व प्रसारण खाते काढून घेण्यात आले अशी चर्चा आहे. तसेच काही दिवसांपूर्वी माध्यमांची मुस्कटदाबी करण्याची नियमावलीही त्यांनी केली होती. त्याच दिवशी त्यांना ती मागेही घ्यावी लागली होती. हे सर्व वादग्रस्त निर्णय इराणी यांना भोवले आहेत. आता त्यांच्याकडे केवळ वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कारभार उरला आहे.
स्वराज यांचे मंत्रिपद कायम, जेटलींचे काढले गेले
सुषमा स्वराज यांच्यावरही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती पण तरीही त्यांच्या खात्याचा भार अन्य कोणावरही सोपविण्यात आला नव्हता. शस्त्रक्रियेनंतर स्वराज यांना पूर्ण बरे होण्यास तीन महिने लागले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देखील गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहे. मात्र त्यांच्याही पदाचा भार अन्य मंत्र्यांवर सोपविण्यात आलेला नाही. मग अरुण जेटली यांच्या संदर्भातच मोदी यांनी असा निर्णय का घेतला अशी चर्चा आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर जेटली यांच्या खांद्यावर मंत्रीपदाची जबाबदारी नसल्यास कोणताही ताण न येता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारण्यास मदत होईल, असा विचार मोदी यांनी केला असल्याचे सांगण्यात येते.