दिल्ली बाॅम्बस्फाेटाचे इराणी कनेक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 07:47 AM2021-01-31T07:47:47+5:302021-01-31T07:48:25+5:30
दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेला बाॅम्बस्फाेट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची जबाबदारी जैश- उल- हिंद या संघटनेने घेतली असून, या घटनेचे इराणी कनेक्शन तपासण्यात येत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेला बाॅम्बस्फाेट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची जबाबदारी जैश- उल- हिंद या संघटनेने घेतली असून, या घटनेचे इराणी कनेक्शन तपासण्यात येत आहे. घटनास्थळावरून सुरक्षा यंत्रणांना इस्रायली राजदूतांना उद्देशून लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ‘हा तर एक ट्रेलर आहे,’ असे त्यात म्हटले आहे.
ही माहिती टेलिग्राम ॲपवरील चॅटमधून उघड झाली आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांकडून या दाव्याची पडताळणी सुरू आहे. घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीमध्ये इराणी लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अणुशास्त्रज्ञ माेहसीन फखरजादेह यांचा ‘शहीद’ असा उल्लेख आहे. गेल्या वर्षी दाेघांचीही हत्या झाली हाेती. त्यामुळे बाॅम्बस्फाेटामागे इराणी कनेक्शनचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत थांबलेल्या इराणी नागरिकांची माहिती मागविण्यात आली आहे.