भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये इराकची आघाडी, सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 12:01 PM2017-12-19T12:01:29+5:302017-12-19T12:10:16+5:30
गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरवण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारत आणि इराक या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली- गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरवण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारत आणि इराक या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या काळामध्ये इराककडून भारताने 25.8 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत सादर केलेल्या उत्तरात दिली.
भारताला कच्चे तेल पुरवण्यात आजवर आघाडीवर असलेला सौदी अरेबिया या काळामध्ये 21.9 दशलक्ष टन इंधन पुरवू शकला तर इराण 12.5 दशलक्ष टन कच्चे तेल भारताला निर्यात करुन तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. इराकने गेल्या काही वर्षांमध्ये कमी दरामध्ये भारताला कच्चे तेल पुरवले आहे, त्याचाच परिणाम म्हणून भारताने मोठ्या प्रमाणात इराककडून इंधन आयात केल्याचे सांगण्यात येते.
Iraq is India's top supplier of crude oilhttps://t.co/r2QzsztwD9#Iraq
— Iraq Daily News (@IraqDaily) July 26, 2016
इराकने 2014-15 यावर्षी 24.5 दशलक्ष टन कच्चे तेल भारताला आयात केले होते ते 2015-16 या वर्षात 37.5 दशलक्ष टनांवर पोहोचले. मात्र 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये 40.4 दशलक्ष टन तेल पुरवणाऱ्या सौदी अरेबियाच्या निर्यातीत घट होऊन 2016-17 या वर्षात हा देश भारताला 39.5 दशलक्ष टन कच्चे तेल पुरवू शकला आहे. या वर्षीही असाच कल कायम राहिला तर इराक सौदी अरेबियाची जागा घेईल असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या काळामध्ये भारताला व्हेनेझुएलाने 11.5 दशलक्ष टन, नायजेरियाने 10.6 दशलक्ष टन, संयुक्त अरब अमिरातीने 8.5 दशलक्ष टन कच्चे तेल पुरवले आहे.