आता पैशांविना क्षणार्धात बुक करता येणार रेल्वेची तात्काळ तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:57 PM2017-08-03T16:57:56+5:302017-08-03T16:58:32+5:30
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीनं रेल्वे तिकीट बुक करणा-यांसाठी एक अनोखी योजना आणली आहे.
नवी दिल्ली, दि. 3 - गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनानं ग्राहकांसाठी नवनव्या योजना आणल्या आहेत. ब-याचशा योजनांचा ग्राहकांना चांगला फायदाही होतोय. रेल्वेने प्रवास करणा-या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीनं रेल्वे तिकीट बुक करणा-यांसाठी एक अनोखी योजना आणली आहे.
या योजनेनुसार रेल्वे प्रवासी ऑनलाइन पद्धतीनं तात्काळ तिकिटांचे पैसे न देताही त्या तिकीट बुक करू शकतात. तसेच बुक केलेल्या तिकिटांचे पैसे नंतरही देता येऊ शकतील, अशी व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे तुम्ही आता एकही रुपया न देता तात्काळ तिकीट बुकिंग करू शकता. रेल्वे प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा, यासाठी भारतीय रेल्वेने ग्राहकसेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकाला आयआरसीटीसीद्वारे तात्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी ऑनलाइन पेमेंट करावे लागत असे, ग्राहक ऑनलाइन पेमेंट करेपर्यंत सर्व तिकीट बुक होत होत्या. मात्र आता ग्राहकाला तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेसाठी जास्त वेळ खर्ची घालावा लागणार नाही. रेल्वेने आता घरपोच तिकिटांची सुविधा सुरू केलीय. ज्यामध्ये प्रवाशांना घरबसल्या तिकीट मिळू शकते. आयआरसीटीसीने घरपोच तिकिटांची व्यवस्था सुरू केली असून, नागरिक रोकड किंवा अन्य मार्गाने तिकिटांचे पैसे देऊ शकतात.
भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनने ग्राहक सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये ग्राहक तिकीट हाती पडल्यानंतरच पेमेंट करू शकतात. ऑनलाइन बुक केलेले तिकीट हातात आल्यानंतरच ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. आयआरसीटीसीने आपली वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून पे ऑन डिलिव्हरीची सुविधा सुरू केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. भारतीय रेल्वेने सध्या डिजिटलायझेशनवर भर दिला असून, ऑनलाइन व्यवस्थांच्या माध्यमातून नागरिकांचा त्रास शक्य तितका कमी करण्यावर भर दिला आहे. महसूल वाढवण्यासाठी विविध पर्यायांवर अंमलबजावणी करताना ग्राहक सेवांनाही तितकेच प्राधान्य दिले आहे.
ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकिटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे तिकिटांच्या ऑनलाइन बुकिंगवर आधीच अनेक पद्धतीने सूट दिली जाते आहे म्हणूनच रेल्वे तिकिटांवर देण्यात येत असलेली सर्व्हिस चार्जची सूट 30 जून नंतर स्थगित करावी. अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेची ही मागणी स्वीकारली गेली तर ऑनलाइन तिकीट बूक करताना प्रवाशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो.