तेजस एक्स्प्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार; उद्यापासून बुकिंग सुरू, नवीन नियमांबद्दल जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:31 PM2020-10-07T13:31:40+5:302020-10-07T13:32:38+5:30
IRCTC Tejas Train restart : तेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस पुन्हा रुळावर धावणार आहे. आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ही माहिती दिली आहे.
दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना व्हायरसमुळे 22 मार्चपासून या ट्रेनचे परिचालन थांबविण्यात आले. पण, आता 17 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. आयआरसीटीसीमार्फत या ट्रेन चालविण्यात येतात.
उद्यापासून ट्रेनचे बुकिंग
तेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. आयआरसीटीसीकडून (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) या ट्रेनच्या सीटचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान प्रवाशांना ट्रेनमध्ये पॅक करुन जेवण मिळणार आहे. मंगळवारी आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
'या' मार्गांवर ट्रेन धावणार
देशाची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लखनऊ ते दिल्ली मार्गावर सुरु झाली. त्यानंतर अहमदाबाद-मुंबई मार्गावर दुसरी खासगी ट्रेन सुरू झाली. तिसरी खासगी ट्रेन वाराणसीहून इंदूरला गेली. कॉर्पोरेट क्षेत्रातील देशातील पहिली ट्रेन तेजस सुमारे एक वर्षापूर्वी लखनऊ ते दिल्ली मार्गावर सुरु झाली होती. आधुनिक सुविधांसहित ही ट्रेन प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाली. उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याचा नियम असलेली देशातील ही पहिली ट्रेन आहे.
तेजस एक्सप्रेस आपल्या खास प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये उत्कृष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ड्रिंक विनामूल्य आहेत. तसेच, ट्रेनला उशिरा झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाते. एका तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 100 रुपये आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्या 250 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.