IRCTC User Data: IRCTC चा मोठा निर्णय; प्रवाशांचा डेटा विकणार, 1000 कोटी रुपये जमवण्याची योजना...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:48 PM2022-08-19T12:48:26+5:302022-08-19T12:48:34+5:30
Irctc User Data: ट्रेनचे तिकीट बूक करण्यासाठी अनेकजण IRCTCचा वापर करतात. IRCTCकडे रेल्वे प्रवाशांचा सर्व खाजगी डेटा आहे.
IRCTC User Data: ट्रेनचे तिकीट बूक करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण IRCTC अॅप किंवा वेबसाइटचा वापर करतो. IRCTC कडे रेल्वे प्रवाशांचा सर्व डेटा आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता IRCTC ने प्रवाशांच्या डेटाबाबत अतिशय धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रवाशांचा डेटा विकण्याचा विचार करत आहे.
प्रवाशांच्या विश्वासाला तडा...
IRCTCने हा डेटा विकण्यासाठी टेंडरही जारी केले आहे, म्हणजेच आता IRCTC डेटा कमाईवर काम करणार आहे. हा डेटा आयआरसीटीसीच्या साइटवर असून, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संताप आणि विरोध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. IRCTCकडे प्रवाशांची वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती आहे. प्रवासी आपली वैयक्तिक माहिती विश्वासाच्या आधारावर साइटवर अपलोड करत असतो, पण आता IRCTC च्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या विश्वासाला तडा जाणार आहे.
कोणती माहिती सार्वजनिक होणार?
भारतीय रेल्वेने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी त्यांची रेल्वे तिकिटे IRCTC द्वारे बुक करतात, म्हणजेच कंपनीकडे डेटा बेस खूप मोठा आहे. यामुळेच आता त्यावर कमाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात, सूत्रांचे म्हणणे आहे की डेटातून निश्चितपणे कमाई केली जात आहे, परंतु प्रवाशांच्या बँकेच्या व्यवहाराशी संबंधित कोणतेही तपशील शेअर केले जाणार नाहीत. एवढेच नाही तर पॅन कार्ड, आधार कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही माहिती कोणाशीही शेअर केली जाणार नाही. ट्रॅव्हल पॅटर्न, हिस्ट्री आणि लोकेशनशी संबंधित डेटामध्ये कंपन्या स्वारस्य दाखवू शकतात, असे सांगण्यात येत आहे.