आयर्न लेडी इरोम शर्मिला अडकल्या विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 05:43 PM2017-08-17T17:43:28+5:302017-08-17T17:52:24+5:30

जर निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरॉम शर्मिला यांनी सांगितलं होतं

Iron Lady Irom Sharmila marries Long-Time Partner Desmond Coutinho | आयर्न लेडी इरोम शर्मिला अडकल्या विवाहबंधनात

आयर्न लेडी इरोम शर्मिला अडकल्या विवाहबंधनात

Next
ठळक मुद्देअनेक वर्षांपासून आपला जोडीदार असलेल्या डेस्मंड कुटिन्हो सोबत इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकल्या आहेतनिवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरोम शर्मिला यांनी सांगितलं होतं4 नोव्हेंबर 2000 रोजी इरोम शर्मिला यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती 9 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं

कोडैकनाल, दि. 17 - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला अखेर विवाहबंधनात अडकल्या आहेत. अनेक वर्षांपासून आपला जोडीदार असलेल्या डेस्मंड कुटिन्हो सोबत त्यांनी लग्न केलं. डेसमंड हे ब्रिटीश नागरिक आहेत. तामिळनाडूमधील कोडैकनाल येथे उपनिबंधक कार्यालयात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. उपनिबंधक राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. अत्यंत साध्य पद्धतीने पार पडलेल्या या लग्नात दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. 

इरोम शर्मिला यांनी तमिळनाडूतील कोडैकनाल येथील विवाह उपनिबंधकांकडे लग्नासाठी बुधवारी अर्ज केला होता. यावेळी डेस्मंडदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. या दोघांनी हिंदू विवाह कायद्याअंतर्गत विवाह करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हिंदू विवाह कायद्याअंतर्गत आंतरधर्मीय लग्नाला परवानगी देता येत नाही. त्यामुळे या दोघांना विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्नाची नोटीस देऊन ३० दिवसांनंतर लग्न करण्यास सांगण्यात आले होते. 12 जुलै रोजी त्यांनी हा अर्ज केला होता. 

आणखी वाचा
निवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार - इरॉम शर्मिला
अखेर आज 16 वर्षांनी इरॉम शर्मिलांचे उपोषण संपणार

इरोम शर्मिला यांनी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण सोडताना आपली मणिपूर विधानसभा निवडणूक लढवण्याची आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण जर निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरोम शर्मिला यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इरोम शर्मिला यांनी लग्न केलं आहे.  

स्थानिक कार्यकर्ता व्ही महेंद्रन यांनी या लग्नाला विरोध केला होता. जर हे दांपत्य परिसरात राहिलं, तर आदिवासांना कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरं जावं लागू शकतं असा दावा त्यांनी केला होता. मात्र उपनिबंधकांनी त्यांचा विरोध फेटाळून लावत लग्नाला परवानगी दिली. परिसरातील काही आदिवासी संघटनांनी या लग्नाला पाठिंबा दर्शवला आहे. 

4 नोव्हेंबर 2000 रोजी इरोम शर्मिला यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर  एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी इरोम शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या इरोम शर्मिला यांनी 9 ऑगस्ट 2016 रोजी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. आपल्याला मुख्यमंत्री होऊन एएफएसपीए कायदा रद्द करायचा असल्याचं त्यांनी उपोषण सोडताना सांगितलं होतं. मात्र निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. 

इरोम शर्मिला यांनी पीपल रिसर्जन्स अ‍ॅण्ड जस्टीस पार्टी (पीआरजेए) स्थापन करून राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली होती. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या विरोधात त्या थॉबोल मतदारसंघातून उभ्या होत्या. परंतु त्यांना अवघी ९० मते मिळाली. १५ हजार मतांनी इबोबी विजयी झाले. त्यांच्या मतदारसंघात नोटाला यापेक्षा अधिक मते (१४३) मिळाली होती.

Web Title: Iron Lady Irom Sharmila marries Long-Time Partner Desmond Coutinho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.