भयंकर! रेल्वेत खिडकी शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार घुसला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:02 PM2022-12-02T16:02:56+5:302022-12-02T16:03:15+5:30
नीलांचल एक्सप्रेसच्या सेकंड कोचच्या सीट क्रमांक १५ वर बसलेल्या प्रवाशासोबत ही दुर्देवी घटना घडली.
अलीगड - रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे एका सामान्य प्रवाशाचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोचमध्ये सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार झाल्याचं समोर आले. या दुर्घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रेल्वेतील इतर प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली. अलीगड जिल्ह्यातील सोमनाथ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर हा प्रकार घडला.
नीलांचल एक्सप्रेसच्या सेकंड कोचच्या सीट क्रमांक १५ वर बसलेल्या प्रवाशासोबत ही दुर्देवी घटना घडली. यात प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत युवक सुल्तानपूरचा रहिवासी असल्याचं सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ, सीआरपीएफ आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला.
आरपीएफ मुख्य अधिकारी केपी सिंह म्हणाले की, आज अलीगड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर नीलांचल एक्सप्रेस ९.३० च्या सुमारास आली. जनरल कोचचा प्रवासी जखमी झाल्याचं कळालं. त्याठिकाणी पोलिसांचे पथक पोहचले तेव्हा इंजिनाच्या नंतर असलेल्या सेकंड कोचमध्ये प्रवाशाच्या मानेत लोखंडी रॉड घुसल्याचं दिसून आले. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता ही घटना कधी, केव्हा आणि कशी घडली याबाबत अधिक तपास सुरू आहे असं त्यांनी म्हटलं.
तर ही घटना जवळपास ९.३० च्या सुमारास घडली. नीलांचल एक्सप्रेस सोमनाथ स्टेशनवरून जाताना एक लोखंडी रॉड अचानक खिडकीची काच तोडून आत शिरला आणि आत बसलेल्या व्यक्तीच्या गळ्यात घुसला. मानेतून आरपार झालेल्या रॉडमुळे प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. अन्य प्रवाशांनी ही माहिती आरपीएफला कळवण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या अधिकाऱ्यांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला असं उत्तर मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशु शेखर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"