निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कोर्टातच केली जावयाची हत्या; वॉशरुममध्ये झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 02:40 PM2024-08-04T14:40:35+5:302024-08-04T14:43:53+5:30
माजी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने भारतीय सेवेत असणाऱ्या जावयाची कोर्टातच गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आलं आहे.
Punjab Crime :पंजाबमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने भरकोर्टात जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टातच माजी पोलीस अधिकाऱ्याने जावयाला गोळ्या घातला. यामुळे जावयाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृत व्यक्ती ही भारतीय महसूल सेवेत कार्यरत होती. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टात खळबळ उडाली आहे. पोलीस कोर्टाच्या आतमध्ये बंदुक पोहोचली कशी याचा तपास करत आहेत.
पंजाबपोलिसांच्या निवृत्त सहाय्यक महानिरीक्षकाने शनिवारी दुपारी चंदीगड जिल्हा न्यायालयाच्या संकुलात आपल्या जावयाचीगोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी मार्चमध्ये एआयजीम्हणून निवृत्त झालेले पंजाब पोलीस सेवेतील अधिकारी मलविंदर सिंग सिद्धू (५८) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर हरप्रीत सिंग (३७) हा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात नवी दिल्लीत तैनात होता. कोर्टातच गोळीबाराची घटना घडल्याने तिथल्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पंजाब पोलिसांचे निवृत्त एआयजी मलविंदर एस सिद्धू यांनी मुलीच्या घटस्फोटाच्या प्रकरणातून आपल्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येची घटना घडली त्यावेळी दोन्ही पक्ष सुनावणीसाठी कोर्टात आले होते. यानंतर पोलिसांनी आरोपी सिद्धूला अटक करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता, जो न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र त्याआधीत सासऱ्याने जावयाला गोळ्या घालून संपवलं.
या घटनेनंतर संपूर्ण कोर्ट परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपी माजी एआयजी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. जावई हरप्रीत सिंगचे त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाचे प्रकरण सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. मलविंदर यांची मुलगी अमितोजशी हरप्रीतने २०२० मध्ये लग्न केले होते. हे हरप्रीतचे दुसरे लग्न होते. दोघेही दोन महिने एकत्र राहत होते. त्यानंतर हरप्रीतच्या आधीच्या लग्नाची माहिती आम्हाला नव्हती, असा दावा अमितोजच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर अमितोजने मोहालीमध्ये हरप्रीत विरोधात तक्रार दाखल केलेली. त्यानंतर हरप्रीतला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सोडून देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांकडे एकमेकांविरोधात याचिका आणि तक्रारी दाखल करण्यात आल्याने हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
सुनावणीदरम्यान मलविंदर सिंग सिद्धूही न्यायालयात पोहोचले होते. सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान, आरोपी मलविंदरने वॉशरूममध्ये जायचे आहे असे सांगितले. त्यावेळी जावई हरप्रीतने मी तुम्हाला रस्ता दाखवतो. त्यानंतर दोघेही वॉशरूममध्ये गेले आणि तितक्यात आरोपी मलविंदरने पिस्तूल काढून एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या हरप्रीतला लागल्या. दोन गोळ्यांचा नेम चुकला आणि एक गोळी दरवाजाला लागली. गोळीबाराच्या आवाजानंतर संपूर्ण कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली. तिथल्या वकिलांनी धावत येत आरोपी मलविंदरला एका खोलीत बंद केले.