Is 10 RS Coin Fake?: बाजारातील १० रुपयांचा कॉईन खरा की खोटा? १४ प्रकारची नाणी बाजारात; सरकार म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 21:14 IST2022-02-10T21:13:48+5:302022-02-10T21:14:23+5:30
10 rupees Coin Fake or Original: बाजारात १० रुपयांचे शिक्के खोटे असल्याचे सांगितले जाते. याच्यामागे हा कॉईन एकसारखा नसल्याचे मुख्य कारण आहे.

Is 10 RS Coin Fake?: बाजारातील १० रुपयांचा कॉईन खरा की खोटा? १४ प्रकारची नाणी बाजारात; सरकार म्हणते...
जेव्हा आपण बाजारात भाजीपाला किंवा अन्य काही घेण्यासाठी जातो, तेव्हा दहा रुपयांचा कॉईन हा खरा नसल्याचे सांगत तो नाकारला जातो. अनेकदा हा प्रसंग तुमच्यासोबत उद्भवला असेल. दोन वर्षांपूर्वी तर कोणीच १० रुपयांचा कॉईन स्वीकारत नव्हते. आजही बऱ्याच ठिकाणी हा कॉईन घेणे टाळले जाते. यावर आता मोदी सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे.
बाजारात १० रुपयांचे शिक्के खोटे असल्याचे सांगितले जाते. याच्यामागे हा कॉईन एकसारखा नसल्याचे मुख्य कारण आहे. १० रुपयांचे विविध शिक्के असलेले कॉईन आहेत. ते सर्व खरे असल्याचे संसदेत सरकारने सांगितले. या १० रुपयांच्या कॉईनचा वापर सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी करणे अधिकृत असल्याचे सरकारने सांगितले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, दहा रुपयांची सर्व प्रकारची नाणी कायदेशीर आहेत. ते म्हणाले की, भारत सरकारच्या अखत्यारीतील विविध आकार, थीम आणि डिझाइनमध्ये तयार केलेली आणि RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) द्वारे प्रसारित केलेली 10 रुपयांची नाणी कायदेशीर आहेत. ते सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये कायदेशीर म्हणून वापरले जाऊ शकतात. राज्यसभेत ए विजयकुमार यांच्या प्रश्नाला पंकज चौधरी उत्तर देत होते.
चौधरी पुढे म्हणाले की, वेळोवेळी १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी, RBI वेळोवेळी प्रेस रिलीझ जारी करते आणि जनतेला कोणत्याही संकोच न करता आपल्या सर्व व्यवहारांमध्ये नाणे स्वीकारण्याचे आवाहन करते. 10 रुपयांची अशाप्रकराची वेगवेगळी 14 नाणी सध्या बाजारात आहेत.