ड्राय आईस एवढा खतरनाक? नेमका प्रकार काय? खाताच तोंडातून रक्त कसे आले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:07 AM2024-03-05T10:07:39+5:302024-03-05T10:08:20+5:30
कार्बन डाय ऑक्साईड गॅस एवढा धोकादायक नसतो. परंतु त्यापासून बनविलेला हा आईस खूप धोकादायक असतो.
गुरुग्रामच्या एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस खायला दिल्याने पाच जणांना तोंडातून रक्त वाहू लागले होते. यापैकी चार जण आयसीयूमध्ये दाखल आहेत. याचे पॅकेट या ग्राहकांनी डॉक्टरांना दाखविले तेव्हा ते माऊथ फ्रेशनर नसून ड्राय आईस असल्याचे समजले. यामुळे मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगताच या अत्यवस्थ ग्राहकांच्या पायाखालची वाळू सरकली होती.
हा ड्राय आईस म्हणजे नेमका काय प्रकार आहे? हे कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. ड्राय आईसला कुलिंग एजंट म्हणून वापरले जाते. याचा वापर वैद्यकीय ते अन्न उद्योगापर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. परंतु ते वापरण्याचे काही नियम आहेत. हा बर्फ पाण्यापासून बनलेला नसल्याने तो कोरडा असतो. उपयुक्त असला तरी तो अति धोकादायक असतो.
सामान्य घरगुती बर्फाचे तापमान उणे 2-3 अंश सेल्सिअस असते. परंतु ड्राय आईसचे तापमान उणे ८० अंशापर्यंत असते. पाण्याचा बर्फ वितळू लागतो तर ड्राय आईस जेव्हा वितळू लागतो तेव्हा धूर निघतो.
पांढरा धूर निघत असल्याने याचा वापर फोटोशूट आणि थिएटरमध्येही केला जातो. तुम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये हा धूर पाहिला असेल, तो याच बर्फाचा असतो. गरम पाण्यात टाकल्यावर या बर्फातून धूर निघू लागतो. यामुळे धुके, ढगासारखे परिणाम दिसतात.
हा बर्फ कसा बनविला जातो...
प्रथम कार्बन डायऑक्साइड 109 डिग्री फॅरेनहाइटवर थंड केला जातो, नंतर दाब दिला जातो. यामुळे हा वायू घनस्वरुपात बनतो व त्याचे छोटे-मोठे तुकडे केले जाऊ शकतात.
संपर्कात आल्यावर काय होते...
कार्बन डाय ऑक्साईड गॅस एवढा धोकादायक नसतो. परंतु त्यापासून बनविलेला हा आईस खूप धोकादायक असतो. कारण तो खूपच थंड असतो. यामुळे शरीरातील पेशी मरू लागतात. यामुळे या बर्फाला थेट स्पर्श करण्यास मनाई असते. ग्लोव्हज घालून हा बर्फ हाताळला जातो. तसेच एअर टाईट बॉक्समध्ये तो ठेवू नये.