विमान आहे की टॉयलेट? एअर इंडियाच्या विमानात आणखी एक घटना, डीजीसीएची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:05 AM2023-01-06T08:05:32+5:302023-01-06T08:06:13+5:30
महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्यामुळे “मद्यधुंद” पुरूष प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आरोपीने माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या न्यूयॉर्क - दिल्ली विमानातील २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेनंतर दहा दिवसांनी पॅरिस - दिल्ली विमानात अशीच एक घटना समोर आली आहे. महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्यामुळे “मद्यधुंद” पुरूष प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आरोपीने माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
या एकूणच प्रकरणी एअर इंडियाचे वर्तन अव्यावसायिक दिसत असून संबंधित अधिकार व क्रू सदस्यांवर कारवाई का करू नये, अशी नाेटीस डीजीसीएने कंपनीला दिली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी दाेन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. विमान सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी विमानतळावर उतरले. तेव्हा मद्यधुंद अवस्थेतील पुरुष प्रवासी सूचनांचे पालन करत नसून त्याने एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली आहे, असे विमान कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफला सांगितले हाेते.
प्रवाशांनी आपसात तडजोड केली
विमान सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमानतळावर उतरले. तेव्हा या घटनेबाबत कर्मचाऱ्यांनी विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सांगितले. सीआयएसएफने प्रवाशाला ताब्यात घेतले. मात्र, दोन्ही प्रवाशांनी आपसात तडजोड केल्याने तसेच आरोपीकडून “लेखी माफीनामा” घेतल्यानंतर त्याला जाऊ देण्यात आले.