दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 08:18 PM2024-10-17T20:18:36+5:302024-10-17T20:21:21+5:30
Sheikh Hasina News:
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर पाच ऑगस्ट रोजी बांगलादेशमधील शेख हसिना यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली होती. त्यानंतर शेख हसिना ह्या भारतात आश्रयाला आल्या होत्या. त्यानंतर शेख हसिना ह्या गाझियाबादमध्ये खरेदी करताना दिसल्या होत्या. मात्र तेव्हापासून शेख हसिना यांच्या ठावठिकाण्याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. यादरम्यान, शेख हसिना यांच्यामुळे भारतबांगलादेशसोबत कुठलाही विवाद ओढवून घेऊ इच्छित नसल्याने शेख हसिना ह्या दिल्ली सोडून गेल्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भारतीय परष्ट्र मंत्रालयाने आता याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना ह्या सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीमध्ये आल्या होत्या. अद्यापही त्या दिल्लीमध्येच आहेत. दरम्यान, बांगलादेशने शेख हसिना यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावलं आहे. तसेच १८ नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही परिस्थितीत त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांगलादेश सरकारनेही शेख हसिना यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवावं, असं आवाहन भारताला केलं आहे.
शेख हसिना ह्या ढाका येथून निघून भाकताकडे निघाल्या. तेव्हा त्या बांगलादेशमधून पूर्वोत्तर भारतात आणि तिथून गाझियाबाद येथील हिंडेन विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर शेख हसिना आणि त्यांची बहीण तेथील एका दुकानात काही खरेदी करताना दिसल्या होत्या. त्यानंतर हसिना यांना दिल्लीमधील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. यादरम्यान, शेख हसिना ह्या दिल्ली सोडून अन्यत्र निघून गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या स्पष्टीकरणामुळे शेख हसिना ह्या भारतात असल्याचंच समोर आलं आहे.