राजकीय फोडाफोडीचा प्रयोग महाराष्ट्रातही यशस्वी? राज्यासह देशाचे लक्ष गुवाहाटीतील घडामोडींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:10 PM2022-06-23T14:10:48+5:302022-06-23T14:18:47+5:30

Maharashtra Politics: गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारमधील भाजपने राजकीय तोडफोड करून अनेक राज्य सरकारे उलथवली असून या साखळीत महाराष्ट्र राज्य सरकारचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

Is the experiment of political sabotage successful in Maharashtra too? The state and the country are focused on the developments in Guwahati | राजकीय फोडाफोडीचा प्रयोग महाराष्ट्रातही यशस्वी? राज्यासह देशाचे लक्ष गुवाहाटीतील घडामोडींवर

राजकीय फोडाफोडीचा प्रयोग महाराष्ट्रातही यशस्वी? राज्यासह देशाचे लक्ष गुवाहाटीतील घडामोडींवर

Next

- सुरेश भुसारी 
नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारमधील भाजपने राजकीय तोडफोड करून अनेक राज्य सरकारे उलथवली असून या साखळीत महाराष्ट्र राज्य सरकारचाही समावेश होण्याची शक्यता आहे. 
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे बहुमतातील सरकार केंद्रात आल्यानंतर विविध राज्य सरकारची सत्ता उलथविण्यात भाजपला यश आले आहे. यात अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, सिक्कीम व मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. सिक्कीम विधानसभेत भाजपचा एकही सदस्य निवडून न आणताही भाजपची सत्ता आली. काँग्रेसचे ४० आमदारांनी २०१६ मध्ये पेमा खांडू यांच्या नेतृत्वात वेगळा गट स्थापन केला. काही महिन्यांनी या गटाचे भाजपात विलीनीकरण झाले. 
कर्नाटकमध्येही जनता दल (एस) व काँग्रेसच्या सरकारचे १६ आमदार फुटले व २०१९ मध्ये पुन्हा येडियुरप्पा यांच्या सरकारची स्थापना झाली. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे कमल नाथ यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, परंतु २०१८ मध्ये काँग्रेसच्या २६ आमदारांनी राजीनामे दिले व अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिवराजसिंह चौहान यांचे सरकार सत्तेवर आले. राजीनामा दिलेल्या २६ पैकी १९ आमदार पुन्हा निवडून आले. 
मणिपूर विधानसभेत काँग्रेसचे २७ व भाजपचे २१ आमदार होते. तरी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला बोलाविले व त्यानंतर काँग्रेसचे ९ आमदार फुटले व भाजपात सामील झाले. 
यावेळी भाजपची नजर शिवसेनेवर पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीत आहेत. हे बंड महाराष्ट्रात यशस्वी होणार काय? हे आता काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्राच्या स्थितीवर दिल्लीत चर्चा
सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय स्थितीबद्दल महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी सीटी रवी यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांची भेट घेतली.
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे काही सेना आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आहे. 
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सीटी रवी यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांची आज भेट घेतली. सीटी रवी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीची माहिती बीएल संतोष यांना दिली.  
महाराष्ट्रात राजकीय वादळ उठल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. तसेच पुढील राजकीय वाटचालीवर पक्षाची भूमिका काय राहावी, यावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

रॅडिसन ब्लू हॉटेलला पोलीस, जवानांचा पहारा  
आसामच्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेल सध्या देशाच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह येथे ठाण मांडून आहेत. या हॉटेल परिसरात जलुकबाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांशिवाय आसाम पोलिसांच्या रिझर्व्ह बटालियनचे जवान पहारा देत आहेत. गुवाहाटीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे हॉटेल १५ किमी दूर आहे.  

आसाम आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र झाल्यास आनंदच : मुख्यमंत्री सरमा
गुवाहाटी : आसाम आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र झाल्यास आनंदच होईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी बुधवारी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सत्तारूढ शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले असून, त्यांना लक्झरी हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्यानंतर सरमा यांचे हे वक्तव्य आले आहे.
राज्यात सर्वांचे स्वागत आहे. कारण पूरग्रस्त राज्याला महसुलाची गरज आहे. गुवाहाटीमध्ये अनेक लक्झरी हॉटेल आहेत. त्यातील सर्व खोल्या बुक झाल्यास आम्ही आनंदी होतो. कारण आमचा महसूल वाढतो. याद्वारे आम्ही जीएसटी प्राप्त करू. तो आम्हाला अडचणीच्या वेळी कामाला येईल. आसामच्या ३२ जिल्ह्यांत पुरामुळे ५५ लाख लोक प्रभावित झाले आहेत. राज्यात पुरामुळे आजवर ८९ जणांचे प्राण गेले आहेत.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आमदारांना येथे येण्यासाठी कोणत्या वादाच्या कारणाची गरज का असावी? आम्ही सर्व पर्यटकांचे स्वागत करतो कारण आम्हाला पुराचा मुकाबला करण्यासाठी पैशाची गरज आहे. आमचे अनेक हॉटेल रिकामे पडलेले असताना आम्ही लक्ष्मीला परत का पाठवावे, असा सवालही त्यांनी केला.
आपण बंडखोर आमदारांची भेट घेणार का, असे विचारले असता सरमा म्हणाले की, त्याची काही गरज नाही. शक्य झालेच तर पाच मिनिटे भेटू शकतो. माझे काही आमदार सहकारी त्यांच्या संपर्कात आहेत. मी पूरस्थितीशी निपटण्यात व्यग्र आहे. 

४६ आमदारांचा पाठिंब्याचा शिंदे यांचा दावा
 बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार या भाजप शासित राज्यात चार्टर विमानाने दाखल झाले. त्यांना गुवाहाटीच्या बाहेरील भागात असलेल्या लक्झरी हॉटेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवले आहे. 
 एकनाथ शिंदे यांनी विमानतळाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलण्यास आधी नकार दिला होता. परंतु, नंतर आपल्याला ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा त्यांनी दावा केला.

Web Title: Is the experiment of political sabotage successful in Maharashtra too? The state and the country are focused on the developments in Guwahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.