वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:27 AM2024-09-25T09:27:40+5:302024-09-25T09:30:51+5:30

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगम DMK च्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले

Is Udhayanidhi elevation as deputy CM imminent? Tamilnadu CM MK Stalin indicates cabinet reshuffle | वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

तामिळनाडूच्या द्रविड मु्न्नेत्र कझगम (DMK) सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्रिमंडळात कोणत्या विभागात बदल होणार हे स्पष्ट नाही परंतु मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंगळवारी क्रिडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले आहेत. पत्रकारांनी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात फेरबदल आणि काही काळासाठी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. त्यावेळी कुठलीही निराशा नाही, बदल होईल असं उत्तर दिले. अमेरिकन दौऱ्यावरून परतल्यानंतर स्टॅलिन यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलावर भाष्य केले आहे. आतापर्यंत २ वेळा स्टॅलिन मंत्रिमंडळ फेरबदलावर बोललेत. 

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगम DMK च्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले. पक्षाच्या मोठ्या विजयात प्रचारात उदयनिधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी येत्या काळात त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवायचा आहे. 

उदयनिधी कायम चर्चेत

काही दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्मावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. सनातन धर्म हा डेंग्यू मलेरियासारखा आहे तो संपवायला हवं असं त्यांनी विधान केले त्यावरून बराच वाद झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी म्हणाले होते की, सनातन धर्म संपवण्यासाठी आयोजित संमेलनात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी सनातन धर्म संपवायला हवा. मच्छर, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यासारख्या गोष्टी ज्यांना आपण विरोध करू शकत नाही आपल्याला ते संपवायला लागेल असं उदयनिधी यांनी म्हटलं होते. कोरोना काळात जनसंपर्क अभियान राबवल्यामुळे पोलिसांनी उदयनिधी यांना अटक केली होती. त्यानंतर काही तासात सोडून दिले. २०२१ साली भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या मृत्यूवर केलेल्या विधानामुळेही उदयनिधी चर्चेत आले होते. 

Web Title: Is Udhayanidhi elevation as deputy CM imminent? Tamilnadu CM MK Stalin indicates cabinet reshuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.