इशात हुसैन यांची TCSच्या अध्यक्षपदी नियुक्ती

By admin | Published: November 10, 2016 08:45 AM2016-11-10T08:45:35+5:302016-11-10T11:59:23+5:30

टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांचे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवले असून त्याजागी इशात हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ishaat Hussain appointed as Chairman of TCS | इशात हुसैन यांची TCSच्या अध्यक्षपदी नियुक्ती

इशात हुसैन यांची TCSच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांचे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवले असून त्याजागी इशात हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून 'सायरस मिस्त्री' यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यानंतर आता मिस्त्री यांना टीसीएसच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले आहे. टाटा समूहातीलच इशात हुसैन यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले असून हुसैन लगेचच सूत्रे हातात घेणार आहेत. 
मोठ्या उमेदीनं ज्याच्या हाती देशातील अवाढव्य अन् शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती, त्याच मिस्त्री यांना २५ ऑक्टोबर रोजी समूहानेच अचानक ‘टाटा’ केला. 
(सायरस मिस्त्रींना 'टाटा')
 
मिस्त्री यांचा वारसदार निवडण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये स्वत: रतन टाटा, टीव्हीएस उद्योग समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजदूत रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. भट्टाचार्य वगळता उरलेले सर्व जण टाटा सन्सच्या संचालक मंडळावर आहेत. आगामी चार महिन्यांत ही समिती नव्या चेअरमनचा शोध घेईल, असे सांगण्यात आले होते. 
 
कोण आहेत इशात हुसैन?
 
१ जुलै १९९९ साली हुसैन टाटा सन्सच्या बोर्डावर कार्यकारी संचालक ( एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) म्हणून रुजू झाले होते. तर २८ जुलै २००पासून ते  आत्तापर्यंत हुसैन यांनी वित्त संचालक म्हणूनही काम पाहिले. 
टाटा सन्स जॉईन करण्यापूर्वी त्यांनी टाटा स्टील कंपनीत सुमारे १० वर्ष वित्त - वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदाची धुरा सांभाळली. तसेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस , व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरही ते कार्यरत होते. 
 
कोण होते सायरस मिस्त्री ?
४ जुलै १९६८ साली जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले. पण, टाटा समूहाला पुढे नेण्यात ते कमी पडले, अशी चर्चा होती. नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती. 2006 मध्ये त्यांनी टाटाच्या संचालक मंडळात प्रवेश मिळविला होता. मिस्त्री यांना टाटामधील सर्वाधिक समभाग असलेल्या शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून चेअरमन करण्यात आले होते.
 
 का झाली मिस्त्रींची गच्छंती ?
टाटा स्टीलचा ब्रिटनमधील व्यवसाय विकण्याचा सर्वांत कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागला. टाटा डोकोमो फुटल्यानंतर जपानच्या डोकोमोसोबत कंपनीचा न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णयही असाच कठीण होता. 
टाटाच्या अंतर्गत नियतकालिकात अलीकडेच त्यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. योग्य कारणांसाठी कठोर निर्णय घ्यायला कंपनीने घाबरायला नको, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.
त्यांच्या या विचारांना कंपनीच्या अडचणीतील काही व्यावसाय शाखांतून प्रखर विरोध झाला होता. त्यांच्या कार्यकाळात कंपनी पुढे जाण्याऐवजी मागे गेली, असा ठपका त्यांच्यावर आला होता.
2015-16 या आर्थिक वर्षातील टाटा सन्सचे उत्पन्न १०८ बिलियन डॉलरवरून घसरून १०३ बिलियन डॉलर एवढे झाले आहे.
2016 मध्ये टाटा सन्सवरील कर्जाचा बोजा २३.४ बिलियन डॉलरवरून वाढून २४.५ बिलियन डॉलर एवढा झाला आहे.
विविध उद्योग क्षेत्रांतील १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते.
टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे सायरस मिस्त्री सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते.
1932 मध्ये नवरोजी सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती. टाटा समूहामध्ये सर्वांत मोठा (१८.५%) भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६पासून संचालक आहेत. 
 

Web Title: Ishaat Hussain appointed as Chairman of TCS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.