इशरतप्रकरणी ‘बनावट विवाद’!
By admin | Published: June 17, 2016 02:55 AM2016-06-17T02:55:12+5:302016-06-17T02:55:12+5:30
इशरत जहाँप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांवरून मोदी सरकार ‘बनावट विवाद’ निर्माण करीत आहे आणि गहाळ झालेल्या फाइल्सवर ‘खाडाखोड’ करून अहवाल तयार केला जात
नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांवरून मोदी सरकार ‘बनावट विवाद’ निर्माण करीत आहे आणि गहाळ झालेल्या फाइल्सवर ‘खाडाखोड’ करून अहवाल तयार केला जात आहे, असा स्पष्ट आरोप काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.
इशरत जहाँ प्रकरणाशी संबंधित गहाळ झालेल्या फायलींचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती या प्रकरणातील साक्षीदाराला शिकवणी देत असल्याचे वृत्त, एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाल्यानंतर चिदंबरम यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून वरील आरोप केला. ‘इशरतप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञांपत्रावरून मोदी सरकारने निर्माण केलेल्या ‘बनावट विवादा’चे व्यापक स्वरूप या दैनिकातील बातमीमुळे उघड झाले आहे. खाडाखोड करून तयार करण्यात आलेला तपास अधिकाऱ्याचा अहवालदेखील सत्य लपवू शकत नाही, असा बोध यावरून घेता येईल,’ असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
‘इशरत जहाँ व अन्य तीन जण खरोखरच चकमकीत मारले गेले होते की त्यांना बनावट चकमकीत मारण्यात आले होते, हा खरा मुद्दा आहे. या प्रकरणी जुलै २०१३ पासून प्रलंबित असलेल्या सुनावणीतूनच सत्य समोर येईल,’ असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दोन्ही प्रतिज्ञापत्रांबाबत मी घेतलेली भूमिका योग्य आहे, हेच या बातमीवरून स्पष्ट होते. पहिल्या प्रतिज्ञापत्रात
(६ आॅगस्ट २००९) केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या गुप्तचर माहितीचा उल्लेख केला होता. इशरत जहाँ आणि अन्य तिघे जण बनावट चकमकीतच मारले गेले होते, असे न्या. एस. पी. तमांग यांनी अहवालात (७ सप्टेंबर २००९) म्हटले होते. त्यांच्या या अहवालामुळे गुजरात व अन्य ठिकाणी मोठे वादळ निर्माण झाले होते. - पी. चिदंबरम, माजी केंद्रीयमंत्री